तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली; गोळी मुलाच्या पायात घुसली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली; गोळी मुलाच्या पायात घुसली

तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाची रिव्हॉल्व्हर कपाटातून खाली पडली; गोळी मुलाच्या पायात घुसली

Oct 18, 2024 12:18 AM IST

मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने गोळ्यांनी भरलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवली होती. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून मुलाच्या पायात घुसली.

रिव्हॉल्व्हर खाली पडून गोळीबार, मुलगा जखमी
रिव्हॉल्व्हर खाली पडून गोळीबार, मुलगा जखमी

पुण्यातील धनकवडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे नेते आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या घरी एक धक्कादायक घटना घडली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाने कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्व्हरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा १३ वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. या मुलाच्या पायातून गोळी आरपार गेली.

सुरक्षा रक्षकाने गोळ्यांनी भरलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवली होती. मुलाचा धक्का लागून बॅग खाली पडली व गोळी सुटून मुलाच्या पायात घुसली. यात मुलगा जबर जखमी झाला आहे. अभय शिर्के (वय १३) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार हेमंत राऊत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन हनुमंत शिर्के (वय ४०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली आहे. मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिर्के हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या धनकवडीतील बंगल्यावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेली रिव्हॉल्व्हर आहे. त्यांनी आपल्या या रिव्हॉल्व्हरमध्ये राऊंड भरुन ती बॅग कपाटात ठेवली होती. याबाबत त्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. त्यांचा मुलगा अभय शिर्के याने कपडे घेण्यासाठी कपाट उघडले. त्यावेळी त्याचा धक्का लागून कपाटातील रिव्हॉल्व्हर असलेली बॅग खाली पडली व त्यातून गोळी सुटली. ही गोळी अभयच्या उजव्या पायाच्या पोटरीत घुसली. या घटनेत मुलगा जबर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रुग्णालय प्रशासनाने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत घराची पाहणी केली आहे. याप्रकरणी नितीन हनुमंत शिर्के यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर