शिवसेनेने आमदार व माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा घरातून रुसून गेलेला मुलगा अखेर पुणे विमानतळावर उतरला आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ माजली होती. त्याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. बँकॉकला जाणारे ऋषिराज सावंत हे आता पुण्यात आपल्या घरी परतले आहेत. आमच्यात कोणताही वाद नाही, पण ऋषिराज घरी न सांगता बँकाकला का गेला याची माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.
दरम्यान पुणे पोलिसांच्या कार्यतत्परचेची राज्यभर चर्चा रंगली आहे. तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवत अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान हवेतूनच माघारी फिरवत सावंतांचा मुलाला पुण्यात लँड करण्यास भाग पाडले. संबंधित व्यक्ती घरातून निघून गेल्यानंतरच्या २४ तासांनंतर अपहरणाची तक्रार घेतली जाते. परंतु तानाजी सावंत यांनी तक्रार दाखल करताच पुणे पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून संबंधित यंत्रणांना कामाला लावले.
पुणे पोलिस सह आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे कंट्रोल रुमला दुपारी ४ वाजता एक निनावी कॉल आला. त्यामध्ये तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी वेगाने पावले उचलली.
स्पेशल चार्टर विमानाने ऋषिराज बँकॉकला जात असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी सुत्रे हलवली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन २००० एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाला. पुणे पोलिस आयुक्तांनी एअर इंडिया ऑथॉरिटीमार्फत सूत्रे हलवून हवेतूनच विमान मागे फिरवले.
पाच वाजता टेक ऑफ झालेले विमान सोमवारी रात्री आठ वाजून २० मिनिटांनी पुणे विमानतळावर लँड झाले. चार्टर प्लेनने बँकॉकला जाणारे ऋषिराज अर्ध्या वाटेतूनच माघारी आला. ऋषिराज सावंत याची आता पुणे पोलीस चौकशी करणार आहेत. कोणत्या कारणासाठी तो बँकॉकला जाणार होता याची चौकशी केली जाणार आहे. तसेच त्यांनी घरी का सांगितलं नाही याचीही माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान ऋषिराज सावंत हे आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लगेच बँकॉकला का जात होते याचीही चौकशी केली जाऊ शकते.
संबंधित बातम्या