पुणे : जगत एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशातही केंद्र पातळीवरून अनेक सूचना राज्यांना देण्यात आले आहे. असे असतांना राज्याचे आरोग्य मंत्री यांनी मात्र, निर्धास्त राहण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी येणारे नव वर्ष हे जल्लोषात साजरे करण्याचा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे.
तानाजी सावंत यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात पिंपरी चिंचवड येथे अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्य मंत्री सावंत म्हणाले, राज्यातील नागरिकांची रोग प्रतिकरक क्षमता चांगली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे नागरिकांनी येणाऱ्या नव वर्षांचा आनंद घ्यावा. प्रत्येक सण आणि सुट्यां जल्लोषात साजरे करा असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात असून कोरोना नियमांचे पालन करत ख्रिसमस आणि नवीन वर्ष साजरे करा असे देखील सावंत म्हणाले.
राज्यातील करोना संदर्भात बोलतांना सावंत म्हणाले. राज्यात बीएफ- ७ या सब व्हेरियंटचे रुग्ण नाही. हा विषाणू राज्यात येऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. बीएफ- ७ या विषाणूचे चार रुग्ण भारतात आहेत. यापैकी गुजरात आणि ओडिसामध्ये प्रत्येकी दोन दोन रुग्ण आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून कोरोना यंत्रणा पुन्हा सक्रिय केली जाणार आहे. राज्यातील ९५ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा कशी आहे हे तपासण्यासाठी २७ तारखेला मॉकड्रील घेण्यात येणार असल्याचे देखील सावंत यांनी सांगितले. दारमुयन आज राज्यात ३२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून एकही रूग्णाचा मृत्यू हा कोरोनामुळे झालेला नाही, असेही सावंत यांनी सांगितले.