alphonso mango market : राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळ्यात सर्वांचे आवडीचे फळ असलेल्या फळांचा राजा हापूस आंब्याची बाजारात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, हापूस असल्याचे सांगत परराज्याच्या आंब्याची विक्री करून ग्राहकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे कृषी उत्पन्न आणि पणन समित्या बाहेरून राज्यात विक्रीसाठी येणाऱ्या आंब्याच्या प्रजाती त्याच नावाने विकण्याचे परिपत्रक काढण्याचा तयारीत आहेत.
कोकणातील हापूस आंबा हा जगात प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने देवगड आणि रत्नागिरी हापूस आब्याला विशेष मागणी असते. सध्या या आंब्याची बाजारात आवक होऊ लागली आहे. एका आंब्याच्या पेटीची किंमत देखील मोठी दिली जाते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून हापूस आंब्याच्या नावाखाली पर राज्यातील आंब्याची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाजार समित्यांमध्ये इतर राज्यांतून आवक होत असलेला इतर जातीचा आंबा हा त्या त्या राज्यांच्या नावासह व आंब्यांच्या जातीसह विक्री न करता तो कोकण हापूस या नावाने बाजाराच्या आवारात विक्री केला जात आहे.
परराज्यातील आंबा हा महाराष्ट्रातील हापुस आहे, असे खोटे सांगितले जाते. हापूस आंबा हा काही मोजक्याच लोकांना ओळखता येतो. सर्व सामान्य नागरिकांना हा आंबा ओळखता येत नाही. यामुळे ग्राहकांची दिशाभूल करून फसवणूक होते. तसेच राज्याच्या हापूस आंब्यांच्या विक्रीवर देखील परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे आंबा खरेदी करतांना ग्राहकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फसवणूक करण्यासाठी कोकणातील पेपरची रद्दी ही परराज्यातील आंब्यांच्या पेटीला किंवा त्यात आंबे गुंडाळून ठेवले जातात. यामुळे हे आंबे कोकणातील असावेत असा देखील ग्राहकांचा समज होऊन हापूस समजून आंबा खरेदी केली जाते. या प्रकारचे 'मिस ब्रडिंग करूनही ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित बातम्या