कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम सध्या नाशिकच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर अनेक आरोप असून मार्च १९९३ मध्ये मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तो आरोपी आहे. भारतातून पळून जाऊन युरोपातील पोर्तुगाल या देशात लपून बसलेल्या अबू सालेमला मुंबई पोलिसांनी २००५ साली काही अटींवर भारतात आणले होते. पोर्तुगालमध्ये एका गुन्ह्यात अबू सालेम जेलमध्ये होता. त्यावेळी भारत-पोर्तुगालदरम्यान गुन्हेगार हस्तांतरण कायद्याद्वारे काही अटींवर मुंबई पोलीस अबू सालेमला भारतात घेऊन आली होती. यातील मुख्य अट म्हणजे अबू सालेमला २५ वर्षापेक्षा जास्त दिवस भारतातील जेलमध्ये ठेवता येणार नाही ही होती. अबू सालेम याने त्याच्या सुटकेची संभाव्य तारीख जाणून घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका विशेष टाडा न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली आहे.
प्राप्त माहितीनुसार अबू सालेमने ऑक्टोबर महिन्यात नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या अधिक्षकांकडे याचिका दाखल केली होती. ज्यात त्याच्या तुरुंगवासाचा एकूण आणि वास्तविक कालावधी आणि उपलब्ध माफी विचारात घेऊन त्याच्या सुटकेच्या तारखेचा तपशील त्याने मागितला होता.
दरम्यान, नाशिक कारागृह प्रशासनाला त्याने २० जुलै रोजी ई-मेल पाठवला होता. मात्र कारागृह प्रशासनाने उत्तर दिले नव्हते. उत्तर न दिल्याने हे अपयशी ठरले. त्यानंतर प्रशासनाने टाडा कोर्टातील सुनावणीदरम्यान उत्तर दाखल केले होते. भारताच्या राष्ट्रपतींच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय बांधिलकीच्या आधारे सरकार सालेमला २५ वर्षांनंतर सोडण्यास बांधील आहे, असे उत्तर कारागृह प्रशासनाने दिले होते.
कारागृह प्रशासनाने सालेमला दिलेल्या उत्तरात भारत सरकार २५ वर्षांचा कालावधी पाळेल, असे नमूद केले असून मुदत संपण्यापूर्वी अशी याचिका युक्तिवाद म्हणून मांडता येणार नाही असेही नमूद केले आहे. त्यामुळे मला जेलमधून कधी सोडणार, याबाबतच्या तारखेची त्याची याचिका टाडा कोर्टाने फेटाळून लावली होती.
अबू सालेमला भारतात आणताना केंद्र सरकार पोर्तुगीज सरकारला दिलेल्या वचनाचे पालन करेल आणि त्याला २५ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात डांबून ठेवणार नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये नोंदवले होते.
अबू सालेम (वय ६२) हा कुख्यात गँगस्टर असून त्याचे पूर्ण नाव अबू सालेम अब्दुल कयूम अन्सारी असे आहे. त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात झाला. अबू सालेमन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीत शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची वाहतूक करणारा चालक म्हणून काम करत होता. त्याचे मूळ गाव आझमगढमधून बेरोजगार तरुणांना मुंबईत आणून त्यांच्याकडून गोळीबार करून घेऊन दुसऱ्या दिवशी परत आझमगडला रवानगी करायचा. त्यामुळे मुंबई पोलिसांना गुन्हेगारांचा शोध लावणे कठीण व्हायचे. त्याच्या या युक्तीमुळे तो मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये प्रसिद्ध झाला होता. २००५मध्ये मुंबई पोलिसांना त्याला पोर्तुगालमधून पकडून मुंबईत आणले होते. सध्या तो नाशिक जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
संबंधित बातम्या