‘उद्धव ठाकरे यांच्या सोबत विश्वासघात झाला आहे आणि विश्वासघात करणारा कधीही हिंदू असू शकत नाही,’ असं वक्तव्य ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज केलं.
मुंबईतील मातोश्री निवासस्थानी त्यांनी आज भेट दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी त्यांचं स्वागत केलं व आशीर्वाद घेतले. यावेळी रश्मी ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांच्या पादुकांचं पूजनही केलं.
या भेटीनंतर मातोश्री बाहेर पडताच पत्रकारांनी शंकराचार्यांना गराडा घातला. त्यावेळी बोलताना शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. 'आम्ही सगळे सनातन धर्म पाळणारे लोक आहोत. पाप-पुण्य मानणारे लोक आहोत. सर्वात मोठा घात गौ घात सांगितला गेला आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा घात विश्वासघात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी हा विश्वासघात झाला आहे. हिंदू धर्मात विश्वासघात हे पाप आहे. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू होऊ शकतो, असं ते म्हणाले.
‘उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या विश्वासघातामुळं आमचंही मन दु:खी झालं आहे. लोकांच्या मनात ते दु:ख आहे. कालच निवडणुकीत ते सिद्धच झालं आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत तोपर्यंत हे दु:ख हलकं होणार नाही,’ असंही शंकराचार्य म्हणाले.
'आम्हाला राजकारणाशी घेणंदेणं नाही. जे सत्य आहे, ते आम्ही बोलतो. पाप-पुण्याबद्दल राजकारणी थोडेच बोलणार, त्याबद्दल तर धर्माचार्यच बोलणार ना, असा प्रतिसवाल अविमुक्तेश्वरानंद यांनी केला.
दिल्लीत प्रति केदारनाथची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं निदर्शनास आणलं असता ते शक्य नसल्याचं शंकराचार्य म्हणाले. ज्याप्रमाणे १२ ज्योतिर्लिंगं आहेत, त्याची स्थळं निश्चित आहेत, तसंच केदारनाथचं आहे. त्याचं स्थान आधीच ठरलं आहे, ते बदलू कसं शकतं,' असा प्रश्न अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. ‘केदारनाथमध्ये २२८ किलो सोन्याचा घोटाळा झाला आहे. त्याबद्दल कोणीच का बोलत नाही? चौकशी का होत नाही?,’ असा सवाल त्यांनी केला.
नरेंद्र मोदी हे आमच्याकडं आले होते. त्यांनी प्रणाम केला. त्यांना आशीर्वाद दिला. आमचा नियम आहे. जो येईल त्याला आशीर्वाद देतो. नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत. ते येतात तेव्हा आशीर्वाद देतो. त्याचं काही चुकलं तरी आम्ही बोलतो,' असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.