तरुंगातून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांनी पहिल्यादांच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानभवन परिसरात दाखल होताच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर, सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर ते शेवटच्या रांगेत बसले. यावरून त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरुन विरोधकांनीदेवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे विधानसभेत अजित पवार गटाच्या बाजूनं सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले. नवाब मलिक हे अजितपवार गटात गेल्याने विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला की,सभागृहात एक आमदार सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यांच्यावर त्यांनीच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. पण दानवेंच्या या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी प्रत्यक्ष तुरुंगात असताना देखील आम्ही मंत्रिपदावरुन काढणार नाहीअसे म्हटलं होतं, ते आता इथं भूमिका मांडत आहेत.
आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. त्यानंतर अजितदादा आमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला भुजबळ बसले आहेत. त्यामुळं तुम्ही आमची काळजी करु नका.
सर्वात आधी तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की, देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतरही ते तुरुंगात असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरुन का काढलं नाही? याचं उत्तर आधी द्या नंतर आम्हाला प्रश्न विचारा. फडणवीसांच्या या उत्तरानंतर सभागृहात गोंधळ झाला.
यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत फडणवीसांना उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, एका तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपनं केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतलं आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचं मंत्रिपद का काढून घेतलं नव्हतं असा प्रश्न विचारतात? फडणवीस भाऊ सरडा सुध्दा आत्महत्या करेल हो!!