Sushma Andhare MLA Disqualification Case : महाराष्ट्रातील राजकारणासाठी आज महत्वाचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय दिला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने ज्यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली ते भरत गोगावले मुख्य प्रतोद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विधिमंडळातील बहुमत हेच पक्ष कोणाचा हे ठरवण्यासाठी महत्वाचं असल्याचे नार्वेकर यांनी म्हटलं. या निकालावर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अनेक सुनावण्या, उलट तपासण्या पूर्ण करून अखेर याचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचे सर्व बंडखोर आमदार पात्र ठरले आहेत. तर शिवसेनेवरील त्यांचा दावा अध्यक्षांनी मान्य केला आहे. या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
आजच्या निकालावर शिवसेना उपनेत्या सुष्मा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, "तुम्ही जिंकलात म्हणजे आम्ही हरलो असं होत नाही, डाव तुमच्या हातात दिला तरी जिंकता तुम्हाला येत नाही" , असा टोला त्यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी भाजप, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे यांना टॅग केले आहे.
नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. 'शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं लवाद म्हणून बसवलेले नार्वेकर यांची वागणूक आम्ही पाहत होतो. न्यायमूर्तीच आरोपी जाऊन भेटल्यामुळं निकाल अपेक्षित होता. त्यांचं संगनमत झालंय हेच दर्शवणारी नार्वेकरांची वागणूक होती. लोकशाहीचा खून करण्यासाठी ह्याचं कटकारस्थान सुरू आहे का ही शंका मी उपस्थित केली होती. ती खरी ठरली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.