Sushma andhare on Akshay shinde encounter : बदलापूरमधील शाळेतील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर आज केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस व्हॅनमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या कंबरेला असलेली बंदूक हिसकावून पोलिसांवर तीन ते चार राऊंड फायर केले. यातील एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली तर दोन ते राऊंड मिसफायर झाले. त्यानंतर सेल्फ डिफेन्ससाठी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने अक्षयवर गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेत त्याला कळवा रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणावर उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठी शंका व्यक्त करत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही घटना खूपच धक्कादायक आहे. आरोपीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली, इतकी साधेपणाने पाहण्यासारखी ही घटना नाही. काही वर्षापूर्वी हैदराबादमध्ये बलात्कार प्रकरणातील चार आरोपींचा एन्काऊंटर झाला होता. त्यावेळीही पोलिसांनी असेच कारण दिले होते की, आरोपींनी पोलिसांनी बंदुक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यातील सत्य अद्याप बाहेर आले नाही.
बदलापूरची घटना ज्या शाळेत घडली, त्या शाळेशी संबंध असणारा आपटे फरार आहे. त्याला अजून अटक झाली नाही. शाळेशी संबंधित अन्य कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र यात अक्षयला गोवलं जात असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अशा परिस्थितीत त्याने गोळी मारून घेतली की अजून काही झालंय? की त्याला कोणी नाईलाजाने गोळी मारली की यातून अजून काही प्रकरण आहे, याच्या मुळाशी जाऊन चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा बनाव केल्याचे दिसत आहे. यावर विश्वास बसत नाही. दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस बंदूक काढून घेतो यावर कोण विश्वास ठेवणार? असा सवालही अंधारे यांनी केला आहे.
प्रकरण हाताळता आलं नसलं की, एन्काउंटर केले जात असल्याचा आरोप गृहमंत्र्यांवर केला. हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी हा प्रकार झाला आहे का? अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर काय लपवण्याचा प्रयत्न झाला? या प्रकरणातील पोलिस निलंबित झाले पाहिजेत. संबंधितांची सीबीआय चौकशी करून नार्को टेस्ट झाली पाहिजे. या प्रकरणात पहिल्यापासूनच पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे.
या प्रकरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शंका उपस्थित केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही. दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणे दुदैवी आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीवर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात पोलीस त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळी झाडली. यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ज्याने या लहान मुलींवर अन्याय केला. आधी विरोधक म्हणत होते की त्याला फाशी द्या. आता विरोधक त्याची बाजु घेत असतील तर ते निंदनीय आहे.