सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा ३५ फुटी भव्य पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. यावरून राजकीय वातावरणही तापलं असून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनाच्या एक वर्षाच्या आतच कोसळल्याने या पुतळ्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. याविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला न्यायालयाने परवानगी नाकारल्यानंतर महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांविरोधात राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा घेऊन निर्देशने केली व यावर जोडे मारून आंदोलन केले. यावरून विरोधकांवर निशाणा साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान दिलं होते की, हिंमत असेल तर समोर या, आमच्या प्रतिमांना जोडे काय मारता?यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची राज्यात जनसन्मान यात्रा सुरू आहे. सोमवारी ही यात्रा बारामती येथे होती. यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहेत, मात्र त्यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन विरोधकांनी सुरू केलेले राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांना जोडो मारले,आंदोलन केले. पण हिंमत असेल तर त्यांनी आमच्यासमोर यावे, असे आव्हान अजित पवार यांनी भाषणातून दिले.
अजित पवारांच्या आव्हानाला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणतात, की हिंमत असेल तर समोरासमोर येऊन जोडे मारा. खरं तर शहाण्याला शब्दाचा मार असतो. पण ज्या धतिंगगिरीवाल्यांच्या आशीर्वादाने तलवार-बंदूक-कोयता गँगचा हैदोस सुरू आहे त्यांना शब्दांची किंवा सांकेतिक भाषा कशी कळावी? अशी उपरोधिक टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच जनता आता येत्या विधानसभेला मतपेटीतून जोडे मारेल, असा पलटवारही अजित पवार यांच्यावर केला.
बारामतीत बोलताना अजित पवार म्हणाले की, महापुरुषांचा पुतळा कोसळावा, असे कोणत्याही सरकारला वाटणार नाही. एखाद्या महापुरुषाचा पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहे. अशावेळी विरोधकांनी या दुर्घटनेचे राजकारण करू नये. विरोधकांनी आमच्या प्रतिमांना जोडे मारले. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी समोरासमोर यावे. विरोधक राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. पुतळा कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, असेच सरकारचे म्हणणे असल्याचे अजित पवार म्हणाले.