शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट आणि भाजपच्या हात धुवून मागे लागल्या आहेत. सुषमा अंधारे सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी गमावत नाहीत. दरम्यान, सुषभा अंधारे यांनी आता त्यांच्या ट्विटर हँडलवरुन पोलीस व्हॅनचा व्हिडिओ शेअर करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ एक पोलीस व्हॅन उभी असून त्या व्हॅनच्या आडोशाला काही पोलीस काही व्यक्तींशी बोलत आहेत. तसेच त्यांच्याकडून काहीतरी घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पुणे जेल रोड येथील असल्याचा दावा केला जात आहे.
सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड.”
या व्हिडिओमध्ये एक पोलीस व्हॅन रस्त्याच्या कडेला उभी आहे, जिथे पोलीस काही व्यक्तींशी बोलत आहे. काही वेळाने त्या लोकांना काही पाकिट दिली. ही पाकीट घेऊन पोलीस व्हॅनच्या आत गेले. या व्हॅनच्या आतमध्ये कैदी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा नेमका काय प्रकार आहे? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या व्हिडिओच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.