Suryaprabha e book edition : 'डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य, आठवणी कथन आणि जतन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी संपादित केला 'सूर्यप्रभा' हा ग्रंथ अद्वितीय आहे. प्रत्येकानं तो वाचून जपून ठेवावा,' असं आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी नुकतंच केलं.
'सूर्यप्रभा' या ग्रंथाच्या ई बुक आवृत्तीचं प्रकाशन शनिवारी दादरच्या डॉ. आंबेडकर भवनात झालं. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अखेरच्या टप्प्यात त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी दिलेलं समर्पित योगदान हे निर्विवाद आहे. माईसाहेबांचं कार्य आणि त्याग अनुकरणीय आहे. तो सर्वांसाठी जरूर अभ्यासायला हवा, असं भीमराव आंबेडकर यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुस्तक मार्केटचे संचालक डॉ. मिलिंद कसबे यांनी सूर्यप्रभा या ग्रंथाच्या आणि ई बुकच्या प्रकाशनामागील भूमिका मांडली. तर, ग्रंथाचे संपादक दिवाकर शेजवळ यांनी आपल्या ग्रंथाचं वेगळेपण अधोरेखित करणारी त्यातील वैशिष्ठ्ये मनोगतपर भाषणात सांगितली.
या समारंभाला प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर, ॲड. जयमंगल धनराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन - कार्य आणि चळवळीचे संशोधक विजय सुरवाडे, पँथर नेते सुरेश केदारे, राजकीय विश्लषक सुनील कदम, संविधान समर्थक दलाचे नेते सतीश डोंगरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सूर्यप्रभा हा ग्रंथ महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Din) दिनानमित्त ५ आणि ६ डिसेंबर रोजी दादर ( पूर्व) येथील डॉ. आंबेडकर भवन आणि चैत्यभूमी- शिवाजी पार्क येथील सुगावा प्रकाशनच्या बुक स्टॉलवर वाचकांसाठी उपलब्ध आहे, असं पुस्तक मार्केटतर्फे डॉ. मिलिंद कसबे यांनी यावेळी जाहीर केले.
संबंधित बातम्या