Supriya Sule in NCP Shirdi Shibir : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा वाद असल्याच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेवर कधीही न बोलणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच यावर खुलेपणानं भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी मीच अधिक योग्य आहे, असं त्यांनी सांगून टाकलं आहे.
शिर्डी इथं झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिराला स्ंबोधित करताना त्या बोलत होत्या. अजित पवार व त्यांच्या गटाचं नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला 'आमचं प्रेरणास्थान यशवंतराव चव्हाण आहेत, कोणी माझ्याबद्दल काहीही म्हणो, पण यशवंतरावांचा वारसा पुढं नेण्याचा अधिकार कोणाला असेल तर तो फक्त सुप्रिया सुळेला आहे. इतर कोणाला नाही. अजित पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शांवर चालत नाहीत, असं त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादीमध्ये सुप्रिया सुळे यांचं महत्त्व वाढत असल्याचं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेचाही सुप्रिया यांनी समाचार घेतला. ‘मी उच्चशिक्षित आहे, मी ठरवलं असतं तर पुण्यातील एखाद्या खासगी कंपनीची सीईओ झाले असते... पण राजकारणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यावर माझा विश्वास होता. त्यामुळं राजकारणात आले. इथं आल्यावर मी काय मागितलं? मी फक्त लोकसभेचं एक तिकीट मागितलं, बाकी काही नाही. कारण ,’ याची आठवण त्यांनी करून दिली.
अजित पवार यांच्या हातात सर्व सूत्रं असताना पक्ष कसा चालवला जात होता यावर सुप्रिया सुळे बोलल्या. 'केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव येताच त्यांनी लोटांगण घातलं. मात्र, मी प्रामाणिक असल्यानं घाबरले नाही आणि घाबरणारही नाही. माझ्याकडं लपवण्यासारखं काही नाही, मी प्रामाणिक आहे... माझा नवरा कंत्राटदार नाही किंवा मी स्वत: कंत्राटदार नाही, असं त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व राज्य सरकारमधील कंत्राटी नोकरभरती थांबवली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
संबंधित बातम्या