Sunil Tingre send notice to Sharad Pawar : पुण्यात कल्याणी नगर येथील पोर्शे अपघात प्रकरणी आरोपी मुलाला व त्याचा वडिलांना मध्यरात्री जाऊन मदत केल्याचा आरोप आमदार सुनील टिंगरे यांच्यावर आहे. या प्रकरणी टिंगरे अडचणीत आले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा सुनील टिंगरे यांच्या विरोधात वापरला जात असल्याने टिंगरे संतापले आहे. या प्रकरणी बदनामी केली जात असल्याने सुनील टिंगरे यांनी थेट शरद पवार यांना नोटिस पाठवली आहे. माझी बदनामी केली तर कोर्टात खेचेन, अशी नोटिस नोटीस वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना पाठवल्याचा गौप्यस्फोट खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वडगाव शेरी मतदार संघातून अजित पवार गटाचे सुनील टिंगरे तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून बापू पठारे निवडणूक रिंगणात आहेत. बापू पठारे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला.
या सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या, सर्व महत्त्वाचे प्रश्न सुषमा अंधारे यांनी त्यांच्या भाषणात मांडले. पण, मला एक गोष्ट सांगायची आहे जी त्यांना देखील माहिती नाही. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एका वेगळ्या व्यक्तीसाठी तिकीट मागितल होतं. त्या व्यक्तीला शरद पवारांच्या सहीने एबी फॉर्म मिळाला. मात्र, त्या व्यक्तिने काय केले हे सर्वांना माहिती आहे. ज्या पोर्शे करणे दोघांना चिरडले त्या मुलांच्या आई-वडिलांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. मात्र, आरोपीला स्थानिक नेत्याने पिझ्झा खायला घातला. हे वास्तव आहे. याच्या बद्दल पवार साहेब देखील बोलले, सुषमा ताई तुम्ही बोललात. मात्र, सुषमाताई तुम्हाला माहिती नसेल की, ज्या ८० वर्षांच्या योद्ध्याने त्यांच्या एबी फॉर्मवर सही केली. ज्यांच्यामुळे ते निवडून आले. त्यांनी आदरणीय पवार साहेबांना नोटीस पाठवली आहे. जर त्यांची पोर्श प्रकरणी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन, असे नोटीसीत म्हटलं आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या व्यक्तीला मी आव्हान करते पोर्शे अपघातात ज्यांची हत्या झाली, त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ज्याने गुन्हा केला, त्या व्यक्तीच्या मागे तुम्ही उभे राहिला. तुमच्यात जर हिंमत असेल तर मला, रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारे यांना देखील नोटिसा पाठवा. आम्ही कुणाला घाबरत नाही. कारण आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, असे सुळे म्हणाल्या.