महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मोठी घडामोड आज समोर आली आहे. अजित पवार गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सुरुवातीपासून हा पक्ष शरद पवारांचा आहे आणि त्यांनीच हा उभा केला आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांनी घर बांधलं त्याच वडिलांनाच घराबाहेर काढलं आहे. शून्यातून सुरु केलेला हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेतला आहे.
मला अपेक्षित होतं तेच घडलं आहे. मला या निकालाबद्दल काहीच आश्चर्य वाटलं नाही. शिवसेनेसोबत जे घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत घडलं आहे. आम्ही पुरावे दिले, आम्ही युक्तीवाद लढला, आमची सत्याची बाजू होती मात्र आमच्याकडे अदृश्य शक्ती नव्हती. अदृश्य शक्ती त्यांच्या बाजूने आहे आणि ती शक्ती कोणती आहे ही तुम्हीच ठरवा.
दरम्यान सुळे यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत’, असं ट्वीट अजित पवारांनी केलं आहे.