Supriya Sule after Shiv Sena Split Verdict : तब्बल दीड वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर काल अखेर शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल दिला. अपेक्षेप्रमाणं या निकालावर प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निकालावर दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसह त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.
‘मराठी मुलुखात सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून देशभरात आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे हे दोघे साठीच्या दशकातील नेते. आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या गौरवास्पद कामगिरीचा. त्यांनी उभं केलेलं कार्य मोडून काढण्यासाठी त्यांच्या तालमीत तयार झालेल्यांना हाताशी धरून कट-कारस्थानं सुरू आहेत, पण त्यांचे निष्ठावंत सहकारी त्याला धक्का लावू देणार नाहीत. मराठी स्वाभिमानाचा झेंडा आकाशात फडकत राहील. यासाठी प्रयत्नांची शर्थ करू व त्यांना अभिमान वाटेल असं कार्य आपण उभं करू,’ असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. त्यांच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी सुप्रिया सुळे यांच्याशी सहमती दर्शवली आहे, तर काहींनी जुन्या राजकीय भाषणांची आठवण करून दिली आहे.
संबंधित बातम्या