राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका विधानाची राज्यभर जोरात चर्चा सुरू आहे. सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत एक वक्तव्य केल्याने भाजप नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधायला सुरूवात केली. काहींनी सुप्रिया सुळे यांना जातीयवादी तसेच किडकी बहीण म्हणायला सुरूवात केली. या वादावर आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"शिंदे-पवार से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही..." असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याचं म्हणत भाजप नेत्यांनी त्यांना लक्ष्य करायला सुरूवात केली. शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ आहेत. सुप्रिया सुळे हे सगळं लहानपणापासूनच त्यांच्याकडून शिकल्या. लिंबाच्या झाडाला गोड फळं येण्याची अपेक्षा करून नका. जसा बाप तशी लेक, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. केवळ ब्राम्हण असल्यामुळे फडणवीसांना जाणून-बुजून टार्गेट केलं जात आहे. विशिष्ट संघटनांना बळ देऊन, काही पत्रकारांना हाताशी धरून फडणवीसांवर टीका केली जात असल्याचे पडळकर म्हणाले.
फडणवीसांबाबतच्या केलेल्या विधानाविषयी स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी असं बोलल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे का. मी हे सगळं कुठे बोलले याचा पुरावा द्या. महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, मी असं बोलू शकत नाही. त्यांना माझी बोलण्याची पद्धत माहिती आहे. जे टीका करत आहेत त्यांनी सांगावे मी हे वक्तव्य कुठे केले. या कार्यक्रमाचा एखादा व्हिडिओ दाखवावा. माझे भाजपला हात जोडून सांगणे आहे की, मी जर असे बोलले असेल तर याचा व्हिडीओ दाखवावा.
दरम्यान या वादावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्त्याची बातमी मी काही माध्यमात पाहिली. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे म्हणतात की, केवळ देवेंद्र फडणवीसांवर हल्ला करा. यातून राजकारणातील तुमचं स्थान किती बळकट आहे, याचा अंदाज येतो. सर्वांना मिळून एकाच व्यक्तीवर निशाणा साधावासा वाटतो. उद्धवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेसही तेच करते. माझ्याविरुद्ध चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी आधुनिक अभिमन्यू आहे. त्यामुळे चक्रव्यूहात शिरायचं कसं आणि त्यातून बाहेरही यायचं मला माहिती आहे.