निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून राज्यात निवडणूक तयारीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची यावरून वाद निर्माण झाला होता.केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व पक्षचिन्ह घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला बहाल केले होते. त्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वातील गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होते.
याप्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप येणं बाकी आहे. त्याआधीच विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचं घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी शरद पवारांच्या पक्षाने केली होती. हे प्रकरण सुनावणीसाठी न आल्याने शरद पवारांच्या पक्षाच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टासमोर मेन्शन केलं. मात्र यावेळी कोर्टाने घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार दिला आहे. घड्याळ म्हणजे शरद पवारांचा पक्ष हे जनतेपर्यंत पोहोचले असून याचा फटका शरद पवारांच्या पक्षाला बसू शकतो, असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
नवी मुंबईत भाजपची डोकेदुखी वाढली! गणेश नाईक यांना उमेदवारी मिळूनही मुलानं दिला राजीनामा, तुतारी फुंकण्याची तयारी
अजित पवारांची उमेदवार यादी बुधवारी होणार जाहीर -
दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याआधीच त्यांना एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गटातील मंत्री आणि काही आमदारांना सोमवारी अजित पवार यांच्या देवगिरी या सरकारी बंगल्यावर बोलवण्यात आले. तिथे अजित पवार यांच्या हस्ते जवळपास १६ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यात प्रामुख्याने पक्षाचे मंत्री आणि विद्यमान आमदारांचा समावेश आहे. उरलेल्या उमेदवारांना मंगळवारी एबी फॉर्म दिले जाणार असून पक्षाची अधिकृत उमेदवार यादी बुधवारी जाहीर केली जाणार असल्याचे अजित पवार गटातील सूत्रांनी सांगितले. महायुतीमध्ये अजित पवार गटाला ५५ ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, दत्तात्रय भरणे, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, सरोज अहिरे, अण्णा बनसोडे तसेचभरत गावित नवापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या