मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Supreme Court Hearing On Maharashtra Local Body Election Postponed To Be Held On 28 March

Maha Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर

Supreme Court of India
Supreme Court of India (HT_PRINT)
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Mar 21, 2023 12:49 PM IST

SC Hearing on Maharashtra Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यावरील निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.

SC Hearing on Maharashtra Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे आज अनुपस्थित राहिल्यानं सुनावणी होऊ शकली नाही. ही सुनावणी आता मंगळवार, २८ मार्च रोजी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या वर्षभराहून अधिक काळ रखडलेल्या आहेत. अनेक महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. सुरुवातीला करोना, नंतर ओबीसी आरक्षणामुळं या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. कालांतरानं ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, न्यायालयाच्या निकालाआधी जाहीर झालेल्या ९२ नगरपरिषदांमध्ये देखील आरक्षण लागू व्हावं यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात धाव घेतली होती. त्यातच महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वॉर्ड रचना शिंदे-फडणवीस सरकारनं बदलली. या निर्णयासा न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र, न्यायालयानं 'जैसे थे' परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यावर सुनावणीच होऊ शकली नव्हती.

ही प्रलंबित सुनावणी आज होणार असल्यामुळं निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या अनुपस्थितीमुळं न्यायालयानं सुनावणीची तारीख पुढं ढकलली आहे.

निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबणार

राज्यात २३ महापालिका, २०७ नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समितीच्या निवडणुका व्हायच्या आहेत. महाविकास आघाडी सरकारची वॉर्डरचना न्यायालयानं ग्राह्य धरल्यास निवडणूक प्रक्रिया लगेचच सुरू होऊ शकते. मात्र, तसं झालं तरी पावसाच्या आधी निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची चिन्हं आहेत.