Baramati loksabha latest news: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची भावजय म्हणजेच सुनेत्रा पवार या उभ्या राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. असे असताना मंगळवारी बारामती येथे एका कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी एक व्यक्तव्य केले असून त्यांच्या या व्यक्तव्यावरून राजीकय चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील सामाजिक कार्यक्रमात आपली उपस्थिती वाढवली आहे. सुनेत्रा पवार ह्याच उमेदवार असतील या बाबत अजित पवार यांनी अनेक वेळा स्पष्ट वक्तव्य केली आहेत. मतदार संघात ‘योग्य’ उमेदवार दिला जाईल. त्याला निवडून आणा. तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास केला जाईल, याची खात्री देतो, असे अजित पवार अनेकडा म्हटले आहे. त्यामुळे येथे नणंद-भावजयमध्ये दुहेरी लढत होणार हे निश्चित मानलं जात आहे. अशातच सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे एका कार्यक्रमात सूचक व्यक्तव्य केलं आहे.
बारामतीच्या छत्रपती शिवाजीनगर येथे मंगळवारी महिला ग्रुपच्यावतीने 'होम मिनिस्टर खेळ पैठणीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमात त्यांनी हे सूचक व्यक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याविषयी नक्की काय विचार करत आहेत, याबाबत आता नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटले की, दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. जर तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलणार आहे. मात्र, या साठी तुमची साथ आवश्यक आहे. तुम्ही फक्त मला साथ देणं गरजेचं आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांच्या या व्यक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
सुनेत्रा पवार यांनी असे का म्हटले असावे, या बाबत तर्क आणि वितर्क लावले जात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब अध्याप झाले नसले तरी त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. त्यात अजित पवार विरोधात पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे अजित पवार यांचे जून विरोधक असल्याने या निवडणुकीत ते वचपा काढण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी थेट अजित पवारांना विरोध केला आहे.
हे नेते महायुतीत जारी असले तरी त्यांचा विरोध राहिल्यास ही निवडणूक अजित पावर यांच्यासाठी सोपी राहणार नाही. त्यांचा निवडणुकीत पराभव झाल्यास नाचक्की होणार असल्याने अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत फेरविचार सुरु आहे का?, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.