Swami Rishi Swaroopdas Suicide : जळगाव जिल्ह्यातील भुसाळव तालुक्यातील साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरूकुलचे सचिव तथा स्वामी ऋषीस्वरूपदास महाराज (वय २८) यांनी टोकाचे पाऊल उचलंत गुरूकुलमधील त्यांच्या राहत्या खोलीत छताला दोर बांधून गळफास घेत जीवन संपवलं. ही घटना शनिवारी पहाटे ६ च्या सुमारास घडली. त्यांच्या खिशात पेन्सीलने लिहिलेली चिठ्ठी आढळली असून त्यात ‘मोबाइल कनेक्ट टू वायफाय’ असं लिहिलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसाळव तालुक्यातील साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरूकुल आहे. या ठिकाणी विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतात. श्री स्वामी नारायण गुरूकुलचे सचिव स्वामी ऋषीस्वरूपदास महाराज हे शनिवारी गुजरातमधील वडताल येथे त्यांच्या मोठ्या स्वामींसोबत जाणार होते. ऋषीस्वरूपदास यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत शाळेच्या आवारात फिरत पाहणी केली. सर्व काही ठीक असल्याची खातरजमा त्यांनी केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी गुजरातमध्ये जाण्यासाठी गुरुकुलमध्ये गाड्या बोलावण्यात आल्या होत्या. जळगाव येथे सुरू असलेल्या स्वामी नारायण महोत्सवासाठी स्वामी के. के. शास्त्री महाराज व अन्य महाराज गुरुकुल येथे आले होते. स्वामी ऋषीस्वरूपदास हे त्यांच्या सोबत महोत्सवाला जाणार होते. ते तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी काही जण त्यांच्या खोलीत गेले. त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, यातून काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खोलीची खिडकी उघडून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे आढळले.
या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी आश्रमात येत त्यांच्या खोलीच्या खिडकीचे गज कापून अंत प्रवेश केला. यानंतर खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता, त्यांच्या खिशात इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठी सापडली असून त्यात 'वाय फाय कनेक्ट, मोबाइल चेक करा', असे लिहिले आहे. त्यांचा फोन ताब्यात घेण्यात आला असून तो लॉक असल्याने त्याचे लॉक फॉरेन्सिक लॅबमध्ये उघडले जाईल व कॉल रेकॉर्डवरून पुढील तपास केला जाणार आहे. मोबाइल, दोरी व आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. स्वामी ऋषीस्वरूपदास हे मूळचे भुसावळातील असून त्यांचे वडील उमेश कडू भारंबे हे निवृत्त झाले असून मुंबईत राहतात. ऋषीस्वरूपदास यांच्या मागे वडील, आई, भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
संबंधित बातम्या