पुणे : पुण्यातील नामवंत बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या युवतीने ससून रुग्णालयातील इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. युवतीने नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.
आदिती दलभंजन (वय २०, रा. सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आदिती बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकत होती. बुधवारी (दि २९) आदितीची परीक्षा होती. आदितीला महाविद्यालयात सोडण्यासाठी तिचे आई वडील आले होते. तिला महाविद्यालयात सोडून ते त्यांच्या कामानिमित्त निघून गेले.
दरम्यान, साडेदहाच्या सुमारास आदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीवर गेली. येथून तिने उडी मारली. यात अदिती ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवारात धाव घेतली.
बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोलिसांना आदितीचा मोबाइल संच सापडला आहे. तपासासाठी पोलिसांनी मोबाइल ताब्यात घेतला आहे. आदितीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.