Sugarcane Farmers News : राज्यात कमी झालेल्या पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यातील कारखानदारी संकटात सापडली आहे. राज्यातील कारखाने दोन ते अडीच महिनेच सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच कर्नाटक सीमाभागातील कारखाने लवकर सुरू होतात जर राज्यातील ऊस तिकडे गेल्यास येथील कारखाने १०० दिवसही चालणार नाहीत, या भीतीने सरकारने परराज्यात ऊस घालण्यासाठी बंदी लादली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील ऊस परराज्यातील कारखान्यांना घालण्यास घातलेली बंदी राज्य सरकारने उठवली आहे. सहकार मंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पावसाने पाठ फिरवल्याने ऊस पिकांना फटका बसला आहे. यामुळे राज्यातील साखर कारखानदारी वाचवण्यासाठी सरकारकडून परराज्यातील कारखान्यांना ऊस घालण्यास बंदी लादली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाला शेतकरी संघटनांनी विरोध केला होता. या निर्णयाने शेतकऱ्यांची कोंडी होणार होती. राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन उभारलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता.त्यानंतर यावर चर्चा केल्यानंतर सरकारकडून बंदी मागे घेण्यात आली.जो कारखाना जास्त दर देईल त्यालाच आम्ही ऊस पुरविणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
कर्नाटकमधील साखर कारखाने महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीमाभागातील ऊस तिकडे जाण्याची शक्यता होती. तसे झाल्यास राज्यातील साखर हंगाम १०० दिवसही चालणार नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता उस उत्पादकांना परराज्यात म्हणजे कर्नाटकात ऊस पाठवण्यास बंदी घालण्यात आली होती.
संबंधित बातम्या