Mumbai local : मुंबईत कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या महिलांच्या डब्यात एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे डब्यात आग लागून धूर पसरला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं व भीतीचं वातावरण पसरलं होतं. ही घटना सोमवारी कळवा स्थानकात रात्री ८.३० च्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कल्याण येथे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा स्फोट झाला. अचानक स्फोट झाल्याने तसेच महिलेच्या पर्समधून धूर येऊ लागण्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांनी आरडा ओरडा केला. ही रेल्वे काही वेळात कळवा स्थानकात आली. यावेळी मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत तातडीने अग्निरोधकाच्या सहाय्याने आग विझवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. ही रेल्वे काही वेळ कळवा स्थानकावर थांबवण्यात आली. सर्व सुरक्षित असल्याची खात्री केल्यावर ही लोकल कल्याणकडे पुन्हा रवाना करण्यात आली.
दरम्यान, या घटनेची माहिती ही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील दिली. रात्री ८.३० च्या सुमारास सीएसएमटी-कल्याण उपनगरीय लोकल ट्रेन ही कळवा स्थानकावर आली असता या गाडीतील महिला प्रवाशाचा पर्समधील मोबाईल फोनचा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटांमुळे ट्रेनमध्ये मोठा गोंधळ उडाला.
या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मोबाइलचा स्फोट झाल्याने डब्यात धूर झाला होता. ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. रेल्वेत ज्या डब्यात स्फोट झाला त्या डब्यातील एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गाडीच्या डब्यात मोबाईल फोनचा स्फोट झाला. यामुळे डब्यातील सगळेच घाबरले. अनेक प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेतली. सुदैवाने गाडी स्थानकावर होती. रेल्वे पोलिसांनी देखील काही प्रवाशांना लगेच खाली घेत त्यांना बाहेर काढले. ज्या महिलेच्या मोबाईलचा स्फोट झाला ती महिला कोण होती याची अद्याप माहिती मिळालेली नाही.
संबंधित बातम्या