Pune Crime : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलाने आपल्या वर्गमित्राला १०० रुपये देऊन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील दौंडतालुक्यातील सेंट सेबॅस्टियन इंग्लिश स्कूलमध्ये ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेतील ७ वी मध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील मुलाने दुसर्या वर्गातील मुलाला तिच्यावर बलात्कार आणि खून करण्यासाठी १०० रुपयांची सुपारी दिली. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्या शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पीडित विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना माहिती दिली होती. एका विद्यार्थ्याने तिच्या पालकांची खोटी सही केली. याची तक्रार तिने शिक्षकांकडे केल्यावर संबंधित विद्यार्थी संतापला. यामुळे त्याने विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यासाठी वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याला १०० रुपयांना सुपारी दिली. दरम्यान, ज्या मुलाला ही सुपारी देण्यात आली त्याने हा प्रकार पीडित मुलीस जाऊन सांगितला. पीडित मुलीने शाळेतून घरी गेल्यावर ही बाब घरच्यांना सांगितली. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडे संबधित मुलाबाबत तक्रार देण्यास कुटुंबीय गेले. पण त्यांनी उलट पीडित मुलीवर आरोप करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. या घडामोडीनंतर पीडित मुलीचे आई वडीलांनी थेट दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार संबधित शाळेच्या मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील मुलास देखील ताब्यात घेतले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांमधील असे कारस्थान आणि वैमनस्य धक्कादायक आहे. पुणे शहरातील एका हायस्कूलमध्ये घडलेल्या घटनेमुळे पालकांची ही चिंता वाढली आहे. याबाबत अद्याप शाळा प्रशासनाकडून कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही.
गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील हाथरसमधील एका शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली होती. त्या घटनेत शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थ्याने ९ वर्षांच्या मुलाची हत्या केली होती. मुलाच्या मृत्यूमुळे बोर्डिंग स्कूल बंद होईल आणि त्याला घरी जाऊ दिले जाईल, असे त्याला वाटले. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर एसपी चिरंजीव नाथ सिन्हा यांनी सांगितले की, पोलिसांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यामध्ये काही मुलांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थी शाळेतून सुट्टी घेऊन घरी कसे जाऊ शकतो, अशी विचारणा करत असे. दरम्यान, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने टॉवेलने तोंड दाबून मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर शाळा बंद असल्याने त्याला घरी सोडण्यात येईल, असे मुलाने सांगितले.
संबंधित बातम्या