Street Dogs Viral Video In Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना समोर येत आहे. अहमदाबादेत 'वाघ बकरी' चहाचे मालक पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान पराग देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता मुंबईत भटक्या कुत्र्यांनी एका पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
मुंबईतील पवई परिसरात एका रस्त्यावर भटक्या कुत्र्यांनी चालत्या पोस्टमनवर जीवघेणा हल्ला केला आहे. व्हिनस सनसिटी बिल्डिंग कॉम्पलेक्ससमोर ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. सुदैवाने सोसायटीच्या गार्डने वेळीच कुत्र्यांना हाकलल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भटक्या कुत्र्यांनी पोस्टमनच्या शरीरावर लचके तोडले असून त्यात त्याला गंभीर मार लागला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईत भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याच्या घटनांवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच बीएमसी आणि राज्य सरकारने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांकडून सतत नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटनांवरून अनेकांना बाहेर पडण्यास भीती वाटत आहे. अनेक लोकांनी व्हायरल व्हिडिओ शेयर केला असून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या