पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवसेनेला पुन्हा अवजड उद्योग खाते दिल्यावरून उद्धव ठाकरे नाराज

उद्धव ठाकरे

केंद्रीय मंत्रिमंडळातील शिवसेनेचे एकमेव मंत्री अरविंद सावंत यांना देण्यात आलेल्या खात्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. आपली नाराजी त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे नोंदविली आहे, असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने 'हिंदूस्थान टाइम्स'ला सांगितले. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला एकच मंत्रिपद देण्यात आले असून, पुन्हा एकदा अवजड उद्योग खाते देण्यात आले आहे. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळाल्या आहेत. पण पक्षाला केवळ एकच मंत्रिपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या सरकारप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा शिवसेनेला अवजड उद्योग खाते देण्यात आले आहे. यंदातरी शिवसेनेला वेगळे खाते मिळेल, असे शिवसेना नेत्यांना वाटत होते. पण त्यांची अपेक्षा फोल ठरली. दरम्यान, शिवसेना नाराज असली, तरी तूर्त त्याचा युतीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे याच नेत्याने स्पष्ट केले. 

शिवसेनेकडे पुन्हा अवजड उद्योग खाते, आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार

शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, खुद्द अरविंद सावंत हे सुद्धा त्यांना मिळालेल्या मंत्रिपदावरून नाराज आहेत. लोकांशी थेट संबंधित एखादे खाते मिळेल, असे अरविंद सावंत यांना वाटत होते. लोकांच्या कल्याणासाठी थेटपणे काम करता यावे, अशी त्यांची इच्छा होती. आपली काम व्हावीत, यासाठी तर मतदार उमेदवार निवडून देत असतात, असे अरविंद सावंत यांच्या निकटवर्तीयाने सांगितले.

सलग दुसऱ्यांदा शिवसेनेला अवजड उद्योग खाते देण्यात आले आहे. ज्यावेळी खातेवाटप जाहीर झाले, त्यावेळी उद्धव ठाकरे दिल्लीतच होते. त्यांनी तातडीने भाजपच्या नेतृत्त्वाकडे आपली नाराजी व्यक्त केली, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाराजीचे वृत्त स्पष्टपणे फेटाळले. मंत्रिपद किंवा खातेवाटप यावरून शिवसेना नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारमधील प्रत्येक खाते हे महत्त्वाचे आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक खाते योगदान देत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेने सरकारमध्ये सहभाग घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.