पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उद्धव ठाकरेंमुळे ९९ मध्ये युतीचा पराभव, राणेंचा गंभीर आरोप

नारायण राणे

विधानसभेच्या १९९९ मधील निवडणुकीत सध्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी घेतलेल्या एका निर्णयामुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या आणि युतीचे सरकार परत सत्तेत आले नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांचे आत्मचरित्र सध्या चर्चेचा विषय झाले आहे. २००२ मध्ये आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण तो सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यामुळे यशस्वी झाला नाही, असाही आरोप त्यांनी केला.  ‘No Holds Barred: My Years In Politics’ या आत्मचरित्रात त्यांनी हे आरोप केले आहेत.

पुस्तकातील 'किस्सा कुर्सी का' नावाच्या प्रकरणामध्ये नारायण राणे यांनी म्हटले आहे की, शिवसेनेचे उमेदवार निश्चित झाले की पक्षप्रमुखांच्या स्वाक्षरीने अंतिम उमेदवारांची यादी पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकाकडे प्रसिद्धीसाठी पाठवली जाते. १९९९ मध्ये उमेदवारांची यादी तयार झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वाक्षरीने ती 'सामना' कार्यालयाकडे पाठविण्यात आली. उद्धव ठाकरेंना हे कळल्यावर त्यांनी कोणालाही न विचारता स्वतःहून यादीतील १५ जणांची नावे बदलली. या ठिकाणी त्यांनी नवी नावे सुचविली. या बदलाबद्दल आम्हाला काहीच सांगण्यात आले नाही. 

शिवसेनेची मोदींवर स्तुतीसुमने तर काँग्रेसला फटकारले

१९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेला ६९ जागा मिळाल्या. तर मित्रपक्ष भाजपला ५६ जागा मिळाल्या. शिवसेनेच्या यादीतून उद्धव ठाकरे यांनी ज्यांना वगळले होते. त्या सर्वांनी इतर राजकीय पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. विशेष म्हणजे त्या १५ जणांपैकी ११ जण निवडणुकीत निवडूनही आले. जर ते शिवसेनेकडून लढले असते. तर शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ६९ + ११ असे मिळून ८० झाले असते. त्याचबरोबर भाजपच्या ५६ जागा आणि अपक्ष मिळून पुन्हा एकदा युतीचे सरकार सत्तेत आले असते, असे राणे यांनी म्हटले आहे. 

२००१-०२ मध्ये राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नारायण राणे यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील २२ आमदार फोडण्याची तयारीही करण्यात आली होती. विधानसभेतील अविश्वासदर्शक प्रस्तावापूर्वी गोरेगावमधील एका क्लबमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना ठेवण्यात आले होते. त्यावेळी ८ जून रोजी उद्धव ठाकरे त्या क्लबमध्ये आले. काही पूर्वनियोजित बैठकीसाठी मी तिथून बाहेर पडलो होतो. मी तिथे उपस्थित नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना अपमानित झाल्यासारखे वाटले आणि त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला, असे मला तेथील शिवसैनिकांनी सांगितल्याचे नारायण राणे यांनी 'द फॉलआऊट' प्रकरणामध्ये लिहिले आहे.
याच अपमानाचा बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना हाताशी घेऊन जनता दलाचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांची मदत घेतली. आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना बाळासाहेब ठाकरेंचा पाठिंबा होता. तो पाठिंबा मागे घेण्यासाठी जॉर्ज फर्नांडिस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी बोलावे आणि त्यांचे मन परिवर्तन करावे, असे ठरले, असे या पुस्तकात म्हटले आहे.

दरम्यान, राणे यांना केवळ चर्चेत राहायचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडून पुस्तकात असे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये कोणालाही रस नाही. ते काही प्रेरणादायी व्यक्ती नाहीत, असे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

'ठाकरे' चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान- नवाजुद्दीन

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जे नेते आज हयात नाहीत. त्यांची नावे घेऊन काही वक्तव्ये करणे हे चांगले नाही. राणे यांनी ज्यांचा उल्लेख केला आहे ते बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे कोणीही त्यांची बाजू मांडण्यासाठी आज हयात नाहीत. त्यामुळे कोणी त्यांचे नाव घेऊन अशी वक्तव्ये कशी करू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Uddhav changed candidates in 1999 led to defeat in maharashtra assmebly election says narayan rane