'बांगड्या', 'रेशमी किडा' यासारख्या शब्दप्रयोगाने शिवसेनेवर टीकेचे बाण सोडणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आवरा, अशी विनंती शेतकरी कार्यकर्ते आणि वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तिवारी यांनी एक पत्र लिहिले असून यात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थितीत करत संघाने यात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.
आता अमृता फडणवीस यांची आदित्य ठाकरेंवर थेट टीका
शिवसेना-भाजप हे दोन हिंदुत्ववादी पक्ष भविष्यात जवळ येतील, असे आपणास वाटत असले तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील दरी आणखी वाढत आहे, असा उल्लेख तिवारी यांनी भय्याजी जोशींना लिहिलेल्या पत्रात केला आहे. एवढेच नाही तर अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अशा विधानांमुळेच महाविकास आघाडी स्थापन झाली, असेही त्यांनी म्हटले आहे.
एवढी लाचार शिवसेना कधीच पाहिली नाही, फडणवीसांचा प्रहार
तिवारी यांनी आपल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांच्या पत्नी राजकारणावर भाष्य करताना दिसलेल्या नाहीत, असे सांगत अमृता फडणवीस राजकारणात करत असणारा हस्तक्षेप हा अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. सध्याच्या घडीला भाजपमध्ये महिला नेतृत्वाचा अभाव आहे. ही जागा घेण्यासाठी अमृता फडणवीस यांची धडपड सुरु आहे का? असा सवालही तिवारी यांनी उपस्थितीत केला आहे. जो प्रकार सुरु आहे त्याकडे वेळीच लक्ष घातल नाही तर २०२४ च्या आगामी निवडणुकीत भाजपला याची मोठी किंमत मोजावी लागले, असेही तिवारींनी म्हटले आहे.
Refrain Denvendra and Amrita Fadanvis -Kishore Tiwari to RSS pic.twitter.com/eAl2xDtX1X
— kishor Tiwari (@kishortiwari) February 27, 2020
काय आहे नेमकं प्रकरण
आझाद मैदानातील भाजपच्या आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी 'शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही', असे वक्तव्य केले होते. यावर महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशा प्रकारची विधाने शोभत नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेवर सातत्यने टीका करणाऱ्या अमृता फडणवीस यांनी पती देवेंद्र फडणवीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या संघर्षाची गाथा सांगत आदित्य ठाकरेंवर टीका केली. 'रेशमी किड्याला आयुष्यातील 'उपहास' कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन 'रेशमी' आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते,' असा शब्दप्रयोग करत त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते.