औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचे 'संभाजीनगर' करा अशी मागणी लावून धरली आहे. यावरुन त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. परंतु, आता शिवसेनेने चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर २५ वर्षांपूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. दादामियांसारख्या (चंद्रकांत पाटील) लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरुन काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते. तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी लढत होती. पाच वर्षे तुमची सत्ता होती मग नामांतर करण्यास कोण रोखले होते, असा थेट सवालही शिवसेनेने चंद्रकांत पाटलांना केला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; भरधाव टेम्पोने ५ जणांना चिरडले
शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून चंद्रकांत पाटील आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात भाजपच्या वागण्या-बोलण्याला काही अर्थ उरलेला नाही. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मंडळींच्या बोलण्यातून त्यांचे वैफल्य दिसून येते. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ हेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळय़ास लावीत आहेत. आता त्यांनी औरंगाबाद येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे ‘औरंगाबाद’चे नामकरण झालेच पाहिजे, असे म्हटले आहे. भाजपच्या दादामियांची फक्त जीभच सटकली आहे असे नाही, तर बरेच काही सटकले आहे. महाराष्ट्रात कोणीही ‘औरंगजेबा’चे वंशज नाहीत. औरंगजेबाला महाराष्ट्राने कायमचे गाडले आहे.
'त्या' काळी फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते : राज ठाकरे
भाजप व त्यांचे लोक गेल्या पाचेक वर्षांपासून छत्रपती शिवाजीराजांचे नाव घेत आहेत. आता तर ‘पंतप्रधान मोदी हेच शिवाजी महाराज’ अशी पुस्तके छापून वाटण्यापर्यंत त्यांची मजल गेली. त्यामुळे आपण नक्की कोणाचे वंशज आहोत हे त्यांनी सांगायला हवे. पाच वर्षे महाराष्ट्रात भाजपचेच सरकार होते, केंद्रातही त्यांचेच सरकार आहे. मग पाच वर्षांत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ का करू शकला नाहीत? तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या झटक्यात वाराणसीचे प्रयागराज केले. इतरही नावे-गावे बदलली. त्यांना कोणीच अडवले नाही. मग फडणवीस यांना औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ करायला कोणाची परवानगी हवी होती?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.
तृणमूल काँग्रेसचा शहांवर पलटवार, तुम्ही अगोदर दिल्ली सांभाळा!
एकेकाळचे ‘मित्रवर्य’ भाजपास जो हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचा पुळका आला तो का आणि कशासाठी हे काय जनतेला समजत नाही? कधी वीर सावरकर तर कधी ‘संभाजीनगर’, कधी आणखी काही. हे विषय फक्त राजकारण तोंडी लावायलाच घेतलेत ना? ना मुंबईत छत्रपती शिवरायांच्या भव्य स्मारकाची एक वीट रचली, ना वीर सावरकरांना भारतरत्न दिले. तिकडे अयोध्येतही श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने. त्यात आता पापी औरंग्याची भर पडली आहे इतकेच, अशा शब्दांत टोलाही लगावला.