पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात, ५ कार्याध्यक्षांचीही नियुक्ती

बाळासाहेब थोरात

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते अहमदनगरचे बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नितीन राऊत, विश्वजित कदम, बसवराज पाटील, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही निवड जाहीर करण्यात आली. नव्या नेमणुकीत विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला स्थान देऊन प्रादेशिक संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना ते कॅबिनेट मंत्रीही होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलगा सुजय विखे पाठोपाठ भाजपत प्रवेश केला होता. नगर जिल्ह्यात थोरात-विखे यांचे राजकीय वैमनस्य राज्यात नेहमी चर्चेचा विषय असतो. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता थोरात यांना झुकते माप दिल्याचे दिसते.

या नेमणुकांसोबत पक्षाने विविध समित्यांची घोषणाही केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा राज्यात दारुण पराभव झाला होता. यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचाही पराभव झाला होता. चंद्रपुरात शिवसेनेतून आलेले बाळू धानोरकर हे एकमेव खासदार निवडून आले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 

समित्यांचीही स्थापनाः रणनीती समिती - बाळासाहेब थोरात, जाहीरनामा - पृथ्वीराज चव्हाण, निवडणूक - बाळासाहेब थोरात, समन्वय - सुशीलकुमार शिंदे, प्रचार - नाना पटोले, प्रसिद्धी - रत्नाकर महाजन, माध्यम आणि संपर्क - राजेंद्र दर्डा, निवडणूक व्यवस्थापन समिती - शरद रणपिसे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Senior Congress leader Balasaheb Thorat appointed new president of the Maharashtra Congress replacing Ashok Chavan