पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : राज्यात दुप्पटीने वाढणारा रुग्णांचा आकडा नियंत्रणात : राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यातील मृत्यूदर अधिक असून हा दर नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिने राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात वेगाने होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्णांचा आकड्यात घट होणे ही दिलासादायक बाब आहे, असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.  देशातील एकूण कोरोना चाचणीचा विचार केल्यास महाराष्ट्रात २० टक्के चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वाधिक ८० टक्के चाचण्या एकट्या मुंबईमध्ये करण्यात आल्याची माहिती देखील आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली. 

मुंबईत २ हजारहून अधिक रुग्ण, समूह संसर्गाचा धोका नसल्याने मोठा दिलासा

राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून सात सदस्यीय समिती नेमली असून राज्यभरातील  कोरोना रुग्णालयातील डॉक्टर या समितीतील तजज्ञाचे मार्गदर्शन घेऊ शकतात अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील परिस्थिती पाहता चाचण्यांचे प्रमाण आणखी वाढवण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला खासगी आणि सरकारी  प्रत्येकी १५-१५ लॅबमध्ये तपासणी केली जात होती.  यात आता आणखी ६ सरकारी लॅब वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.  

आनंदाची बातमी: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

याशिवाय प्लाझ्मा थेरपीसंदर्भातही राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूतून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मात्या माध्यमातून कोरोनाबाधीत रुग्णावर उपाय शक्य आहे. यासंदर्भात परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने आयसीएमआरकडे केली आहे. याचा आम्ही पाठपुरावा करत असून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. केंद्राकडून मदत होत आहे पण त्यामध्ये आणखी वेग आणण्याची गरज आहे असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे. दिल्लीमधील निझामुद्दीन येथे तबलिग समाजातील कार्यक्रमात राज्यातून सहभागी झालेल्या १४०० लोकांची तपासणी करण्यात आली असून यातील केवळ ५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Rate of doubling of number of coronavirus cases in Maharashtra has come down says health minister Rajesh Tope