पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभा निवडणूक : ... या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

राज्यसभा (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील पक्षीय बलानुसार या निवडणुकीत महाविकास आघाडी चार तर भाजप दोन जागा जिंकू शकते. सातव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

मुंबईत GST आयुक्तांकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता, CBI कडून चौकशी

राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि साताऱ्याचे माजी खासदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जर सातव्या जागेसाठी भाजपने मोर्चेबांधणी करण्याचे निश्चित केले तर भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही नावे चर्चेत असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याचे निश्चित आहे. राष्ट्रवादी दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, एबीपी माझाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

बालाकोट हवाई हल्ल्यांमुळे अशक्य वाटणारे शक्य झाले - हवाई दल प्रमुख

शिवसेना आणि काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते, याची माहिती अद्याप समजलेली नाही. येत्या काही दिवसांत ही नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी निश्चित करतील.

संसदेचे स्थायी सभागृह असणाऱ्या राज्यसभेत एकूण १७ राज्यांतील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये  संपतो आहे. वरिष्ठ सभागृहात महाराष्ट्रातील एकूण ७ सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५५ जागांसाठी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

दोन एप्रिलला राज्यसभेतील सध्याचे सदस्य असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि माजिद मेनन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे अमर साबळे आणि अपक्ष खासदार संजय काकडे निवृत्त होत आहेत.