पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Rain : कोल्हापूर, साताऱ्यासह राज्यात ठिकठिकाणी मुसळधार

कोल्हापुरातील कागल बस स्थानक परिसरात गुडघ्या इतके पाणी साचले आहे.

राज्यभरात उद्या (सोमवारी) मतांचा पाऊस पडणार का? याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झालीय. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, आणि पुणे जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. काही ठिकाणी मध्यम सरी तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर दिसत आहे. 

विधानसभा निवडणूक: उद्याच्या मतदानावर पावसाचे सावट

दुपारी तीन वाजल्यापासून कोल्हापूरला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी दिवाळीच्या तोंडावर शॉपिंगसाठी बुक केलेला दिवस पाण्यात गेला. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर जिल्यातील कागलच्या बस स्थानकावर गुडघाभर पाणी साचले होते. अशीच परिस्थिती कोल्हापूर शहरातील अनेक भागात होती. 

येत्या ४८ तासात राज्यात मेघगर्जनांसह जोरदार पावसाची शक्यता

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. रविवारी सकाळपासून काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मतदार उद्या घरातून बाहेर पडून पाच वर्षांनी येणाऱ्या उत्सवात उत्साह दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय हवामान खात्याने मान्सून परतल्याची माहिती दिली असली तरी राज्यातील विविध ठिकाणी बरसात काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही.