पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंढरीत ५ लाखांवर भाविक दाखल

छाया सौजन्या: शकुर तांबोळी, अकलुज

जाऊ देवाचिया गांवा । घेऊ तेथेची विसांवा ।। 
देवा सांगो सुख दु:ख । देव निवारील भूक ।। 
घालू देवासीच भार । देव सुखाचा सागर ।। 
राहो जवळी देवापाशी । हात जोडूनि पायांसी ।।

 

या भावनेतून सावळ्या विठूरायाच्या ओढीने आणि आषाढी यात्रेच्या या अनुपम्य सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक येथे दाखल झालेले आहेत. श्री विठुरायाचे दर्शन घडल्यामुळे येथे आलेल्या वारकर्‍यांची 'आनंदाचे डोही आनंद तरंग' अशी अवस्था झाली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे पंढरीत जणू भक्तीचा महापूर ओसंडून वाहतो आहे. दक्षिण काशी असलेल्या या पुण्यनगरीमध्ये सर्वत्र टाळ-मृदंगाचा गजर तसेच हरिनामाचा जयघोष ऐकू येत असल्यामुळे सारी पंढरीनगरी भक्तिमय झाली आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो वैष्णवांना घेवून आषाढी वारीने माहेरच्या ओढीने पंढरीस निघालेल्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ आदि सुमारे १०० संतांच्या पालख्या सायंकाळी विसावा पादुका येथील शेवटचा विसावा घेवून रात्री उशीरा पंढरीत दाखल झाल्या. पंढरपूर नगरवासियांच्यावतीने संतांसह आलेल्या वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले. आज दि.१२ जुलै  रोजी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या लाखो वैष्णवांना घेवून संतांच्या पालख्या आज दुपारी भोजनानंतर वाखरीचा निरोप घेवून शेवटच्या पंढरपूर मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. वाखरी तळावर संतांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती.

प्रत्येकाला विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी १ वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडूरंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकर्‍यांमध्ये उत्साह संचारला होता. 

श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी दीड वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी साडे तीन वाजता हा सोहळा विसावा पादुका मंदिराजवळ पोहोचला. त्यानंतर सायंकाळी ३.४५ वाजता निवृत्तीनाथ, सायंकाळी ४ वाजता एकनाथ महाराज, सायंकाळी ४.३० वाजता तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. सर्वात शेवटी दुपारी अडीच वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माऊलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी ५.१५ वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींचे दर्शन घेतले. शेकडो किलोमीटर चालून न थकता, न दमता पंढरीच्या सावळ्या विठूरायाला पाहण्यासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पंढरी समीप आल्याने ओसंडून वाहत होता. 
इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण माऊली माऊली नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हातात देण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरफळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले. 

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, श्री निवृत्तीनाथ महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, श्री संत एकनाथ महाराज यांच्यासह असंख्य संतांच्या पालख्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, एस.टी.बसस्थानक, अर्बन बँक, नाथ चौकमार्गे रात्री पंढरीत मुक्कामी पोहोचल्या.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
आषाढीपर्वकाळानित्ति पहाटे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी सौ.अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रूक्मिणीची शासकीय महापूजा होत आहे.