राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक यांनी आज आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते गणेश नाईक हेही भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट होताच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर घणाघाती वार केला आहे. गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची पद्धतशीरपणे वाट लावल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाला खड्ड्यात ढकलून त्यावर माती टाकून उभे राहणारे हे लोक आहेत. पक्षाने यांच्यासाठी एवढे केले पण त्यांनी अशी परतफेड केली, असे ते म्हणाले.
शिवेंद्रसिंह राजेंचं भाजपत जाण्याचं ठरलं, आमदारकीचा दिला राजीनामा
नाईक हे २०१४ मध्येच पक्ष सोडत होते. मागील ५ वर्षांत हे पक्ष सोडतील, हे मी माझ्या वरिष्ठांना वारंवार सांगत होतो. दुर्देवाने माझ्या बोलण्याकडे कोणी लक्ष दिले नाही. आज अखेर ते खरे ठरले. पक्षाच्या यापूर्वीच्या फुटीलाही तेच जबाबदार आहेत.
यांच्या घरातील एकही व्यक्ती असा नाही ज्याने पद उपभोगले. घराण्याला पद देण्याचेच नाईकांचे राजकारण आहे. आम्ही पुन्हा एकदा पक्ष उभा करु, आणि तोही नवी मुंबईतूनच करु, असा विश्वास आव्हाड यांनी यावेळ व्यक्त केला.