पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी भाषा दिन विशेष : कारण I LOVE मराठी!

मराठी भाषा दिन

किती छान वाटतं जेव्हा एका अनोळखी ठिकाणी, अनोळखी व्यक्तींच्या गर्दीत आपल्याला मराठी बोलणारी किंवा ती भाषा समजणारी एखादी व्यक्ती भेटते. त्यावेळी त्या व्यक्तीला 'तुम्हाला मराठी येतं?' असा प्रश्न विचारताना आपल्याला कोण आनंद होतो. शाळा, महाविद्यालय, कामाच्या ठिकाणी आणि त्यानंतर थोडीफार भटकंती करत असताना सुदैवानं अशी अनेक माणसं मला भेटली ज्यांचं माझ्या मातृभाषेवर माझ्यापेक्षा कांकणभर अधिक प्रेम होतं.आजच्या मराठी भाषा दिनानिमित्त मला भेटलेल्या आणि आय लव्ह मराठी असं संवादाच्या शेवटी मला आवर्जून सांगणाऱ्या काही लोकांची ओळख करून द्यायला मला नक्की आवडेल.

मराठी भाषा दिन विशेष : मराठीपुढील आव्हाने व उपाय

आज आपल्या मातृभाषेत न बोलता उगाच  इंग्रजी, हिंदीत बोलणारे मराठी भाषिक मला अनेकदा भेटले, पण त्यात मला असेही अमराठी लोक भेटले ज्यांनी माझी भाषा शिकली, आत्मसात केली अन् तिच्यावर भरभरून प्रेमही केलं. त्यात पहिली होती दक्षिण भारतीय मैत्रीण ऐश्वर्या. तामिळ ही तिची मातृभाषा असली तरी ती अस्खलित मराठी बोलते. 'या भाषेवर माझं प्रेम आहे', हे ती तितक्याच अभिमाननं सांगते. तिनं एक किस्सा मला सांगितला होता. त्याचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतोय, महाविद्यालयातील प्रकल्पासाठी ती बेळगावमधल्या दुर्गम भागात गेली होती. इंटरनेट, वाहतूक अशा कोणत्याच सोयी त्या ठिकाणी नव्हत्या, बरं तिथल्या लोकांना आपली भाषा समजणार नाही, अशी भीती तिला वाटत होती, कोकणी ही त्या गावची भाषा होती मात्र तिला मराठी येतं होतं, तिनं मराठीत गावकऱ्यांशी संवाद साधला, गावकरीही मोकळेपणानं तिच्याशी बोलले इतकंच नाही तर स्वत:हून पुढे येऊन तिला मदतही केली. 'त्याचक्षणी उत्तम मराठी येत असल्याचा मला खूप अभिमान वाटला, त्या गावकऱ्यांशी माझे या भाषेमुळे कायमचे ऋणानुबंध जुळले. नवी माहिती मिळाली. गावकऱ्यांचं खूप प्रेम मिळालं', असं ती म्हणाली. लहानपणी मराठी मैत्रिणीसोबत खेळताना ती ही भाषा शिकली, "आज मला लोक तू दक्षिण भारतीय कमी आणि महाराष्ट्रीय अधिक आहे असं सांगतात याचा मला खूप अभिमान वाटतो" असं ती अभिमानानं सांगते.

मराठी भाषा दिन विशेष : लोकसंस्कृतीतून भाषेचा आविष्कार

मला भेटलेली दुसरी व्यक्ती म्हणजे मुस्लिम कुटुंबात जन्मलेला ११ वर्षांचा मुलगा मोहम्मद. हिंदी ही त्याची मातृभाषा. घरी कोणालाही मराठी बोलता येत नाही आणि समजतही नाही. हा मात्र उत्तम मराठी बोलतो. इतकं की हा मराठी नाही यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. मराठी ही त्याच्या नसानसांत आहे, त्याच्या मराठी मित्रानं त्याचं नाव चक्क उमेष असंच ठेवलं आहे, त्यानं कधीही ते नाव नाकारलं नाही, आज त्याला मूळ नाव विचारलं तर ते त्याला आठवणार ही नाही ही वेगळीच गंमत.

तिसरे म्हणजे माझे प्राध्यापक गजेंद्र देवडा. मूळचे मारवाडी. मात्र त्यांच्या मराठीला आणि या भाषेवरील प्रेमाला तोड नाही. मराठी भाषेतून ते विद्यार्थ्यांना शिकवतात. ''मी अस्खलित मराठीत बोलतो. मी अमराठी आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही, मात्र जेव्हा मी मारवाडी आहे आणि उत्तम मराठी बोलतो हे समोरच्या मराठी व्यक्तीला कळतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आश्चर्यमिश्रित भाव पाहायला मला खूप आवडतं. घरात सगळेच हिंदी किंवा मारवाडीत बोलतात, पण मी या दोन भाषांव्यतिरिक्त मराठीदेखील उत्तम बोलतो याच कुटूंबियांना कौतुक वाटतं. चांदोबापासून मराठी वाचायची सवय लागली ती आजतागयत कायम आहे.''

मराठी भाषा दिन विशेष : अभिमन्यू आणि रिप व्हॅन व्हिंकल...

चौथी व्यक्ती म्हणजे रेवती. अमराठी. मूळची झारखंडची पण तामिळच. मराठी शिकण्याचा प्रयत्न करतेय. इतका की गुगल ट्रान्सलेशन, इंग्रजी ते मराठी शब्दकोश सारं काही आहे तिच्याकडे. त्यातून तोडकी मोडकी मराठी शिकण्याचा तिचा प्रयत्न सदैव सुरु असतो. यापूर्वी दोन वेगवेगळ्या शहरांत राहिलेली आणि मराठीवर प्रचंड प्रेम असलेली मुलगी. मी यापूर्वी बंगळुरुमध्ये राहिले. मात्र, मला कधी कन्नड शिकावसं वाटलं नाही. मात्र, मुंबईत आल्यावर या भाषेच्या प्रेमात पडले. मराठी खूपच 'स्वीट' भाषा आहे, काहीही झालं तरी मी व्यवस्थित मराठी बोलायला शिकणार म्हणजे शिकणार हा तिचा हट्ट आहे.

पाचवा म्हणजे धीरज शेट्टी. कन्नड ही त्याची मातृभाषा. तो कन्नड आणि तुळूमध्येच संवाद साधतो. मात्र मराठीत छान बोलतो. ''बरेचदा लोकांना आडनाव माहिती नसतं, त्यामुळे मराठीत संवाद साधताना मी मराठी असल्याचं अनेकांना वाटत पण जेव्हा मी दक्षिण भारतीय असल्याचं लोकांना कळतं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवरचा आनंद पाहायला खूप मजा येते'', धीरजनं सांगितलं.

अशी कित्येक उदाहरण माझ्यासमोर आहेत. प्रत्येकाचा  उल्लेख करणं शक्य नाही, मात्र अमराठी असूनही आवर्जुन  मराठीत संवाद साधताना, या भाषेविषयी भरभरून बोलताना मी त्यांना पाहिलं आहे यातल्या बहुतांश सर्वांचं प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं आहे. मात्र इंग्रजीपेक्षा आम्ही मराठीत बोलतो 'कारण I LOVE मराठी' असं ते अभिमानानं सांगतील याचं मला फारच कौतुक वाटतं.

मराठी भाषा दिन विशेष : भाषेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी