पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी भाषा दिन विशेष : भाषेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी

मराठी भाषा दिन (प्रातिनिधिक छायाचित्र)

आधुनिक काळामध्ये प्रसारमाध्यमात अनेक क्रांतीकारी बदल होताना दिसताहेत. या बदलांमुळे घटनांची, प्रसंगांची, कार्यक्रमाची माहिती काही क्षणांत जगभर पोहोचवली जाते. जागतिक घडामोडीही लगेचच कळतात. यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या तंत्रज्ञानाविषयी सर्वांनाच कुतूहल निर्माण झाले आहे. म्हणूनच मनुष्य जगाबरोबर धावताना दिसतो आहे. पण याच धावपळीत ग्रामीण भागात प्रसारमाध्यमांचा बदल म्हणावासा न पोचल्याने तरूण विद्यार्थी बेकार फिरताना दिसतात. या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी महाविद्यालय पातळीवर अनेक उपक्रम राबवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमातही याचा समावेश करणे आवश्यक आहे. पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्याच्या हाताला काम किंवा रोजगाराची संधीही मिळू शकते, असे मला वाटते. म्हणूनच प्रस्तुत लेखात रोजगाराच्या संधीविषयी सविस्तर ऊहापोह केला आहे. 

मराठी भाषा दिन विशेष : मराठी शिक्षणाचे भविष्यचित्र

मराठी भाषेचा विकास 
शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर मराठी भाषेचा अभ्यास करत असताना तो नुसता अभ्यास न राहता मराठी भाषेचे अध्ययन, वाचन, लेखन व आकलन हे स्वयं विकासासाठी करता आले पाहिजे. या दृष्टीने मराठी भाषेकडे पाहणे गरजेचे आहे. कारण अलिकडे मराठी भाषेचा योग्य ठिकाणी वापर करणारे रोजगार मिळवताना दिसताहेत. याची अनेक उदाहरणे देता येतील. निवेदन, सूत्रसंचालन, प्रवचन, निरूपण, कीर्तन, काव्यवाचन, कथाकथन, गीत लेखन, संहिता लेखन, बातमीलेखन, व्याख्यान, भाषांतर, अनुवाद यासारख्या अनेक बाबी साध्य करण्यासाठी मराठी भाषा व साहित्याचा उपयोग स्वयंविकास आणि रोजगार उपलब्धीसाठी करता येऊ शकतो, असे मला वाटते.

भाषांतर आणि अनुवादातून रोजगार  
एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत आणण्याच्या प्रक्रियेस अनुवाद किंवा भाषांतर असे म्हणता येईल. भाषांतर आणि अनुवादाची अनेक क्षेत्रात गरज आहे. मंत्रालयात चाललेले काम, परिपत्रके, केंद्राचे आदेश बऱ्याचवेळा इंग्रजीमध्ये असतात. त्याचे मराठीतून भाषांतर करणे, योग्य अनुवाद करून देणे आवश्यक असते. त्यासाठी मराठी भाषा आणि अभ्यास असणे सोयीचे होते. भाषांतर आणि अनुवादाचा तीन किंवा सहा महिन्यांचा कोर्स केला तर किंवा अनुभव घेतला तर रोजगाराची चांगली संधी मिळू शकेल, असे वाटते. 

मराठी भाषा दिन विशेष: कोल्हापुरी भाषा म्हंजे खटक्यावर बोट जाग्याव प्लटीच बघा!

निवेदन व सूत्रसंचालनातून रोजगार  
आकाशवाणी, दूरदर्शनवरून अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर केले जातात. रसिकांच्या गरजा लक्षात घेऊन कार्यक्रमात बहार आणण्यासाठी निवेदन आणि सूत्रसंचालनाचा नेटका वापर केला जातो. बातमीवाचन, प्रसारण, मुलाखती, संवाद कार्यक्रमाचे संचलन यासाठी सर्रास सुश्राव्य निवेदन आणि सूत्रसंचालन करणाऱ्यांची निवड केली जाते. जितका मोठा आणि दर्जेदार कार्यक्रम तितकेच निवेदक आणि सूत्रसंचालकही प्रभावीच असतात . यासाठी मराठी भाषा, काव्याच्या ओळी, विचार, उदाहरणे याचा वापर केला जातो. मोठमोठ्या लग्नातही सत्कार समारंभाचे निवेदन करणे हाही प्रघात पडला आहे. यासाठी बऱ्याचवेळा चांगले निवेदक व सूत्रसंचालक मिळत नाहीत. त्यामुळे मराठी भाषेच्या अभ्यासक व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रामाणिकपणे सरूवात केली तर चांगला रोजगार मिळू शकेल, यात शंका नाही.

काव्यवाचन, गीतलेखन, व्याख्यान, कथाकथन आणि रोजगार 
रसिक व श्रोत्यांची आस्वादकता अलिकडील काळात खूप वाढली आहे. त्यामुळे वर्तमानपत्र, टीव्ही व अनेक कार्यक्रमातून रसिकतेची उंची वाढवता येत नसेल तर रसिक प्रेक्षक काव्यवाचन, गीतलेखन, कथाकथन व व्याख्यान ऐकणे अशा कार्यक्रमाला पसंती देत आहेत. उत्कृष्ट कवितेचे वाचन, गीतलेखन व गायन, दर्जेदार कथांचे विविध ढंगात सादरीकरण तसेच विविध विषयावर वेगळ्या शैलीमध्ये दिलेले व्याख्यान यासाठी मराठी भाषा आणि साहित्य याचाच आधार घ्यावा लागतो. म्हणून मराठी भाषा आणि साहित्य वाचनातून आपणही चांगले वक्ते, कथाकथनकार, गीतकारही होऊ शकतो. अलिकडच्या काळात या माध्यमातून चांगली रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.

मराठी भाषा दिन विशेष : अयो रामा रामा... लफड्यात फसलो ना...!!!

प्रवचन, निरूपण आणि कीर्तनातून रोजगार 
संत साहित्याने खरंतर भक्ती, शांती, समाधान हे सात्विकतेचे धडे दिले. त्यामुळे मानवी मूल्ये मनुष्याच्या जीवनात रूजली. अध्यात्माच्या माध्यमातून मनुष्य मनःशांतीसाठी देवधर्माकडे वळला. अशातूनच संताच्या ओव्या, अभंग आणि ग्रंथातून मांडलेले विचार त्याला आवडू लागले. तेराव्या शतकातल्या विचाराची एकविसाव्या शतकात गरज भासू लागली. ही गरज मानव प्रवचन, निरूपण आणि कीर्तन यातून पूर्ण करून घेतो. म्हणून तर सध्याच्या काळात संतसाहित्याचा आधार घेत अनेक लहान - मोठे, पुरूष महिला प्रवचन, निरूपण, कीर्तन करताना दिसताहेत. नवनवे प्रवचनकार, कीर्तनकार उदयास येत आहेत. रसिकतेनुसार आधुनिक न देण्याचे प्रमाणही वाढले आहे मुलेही संतवचनाचा आधार होत कीर्तनाचे सादरीकरण करतात. याच माध्यमातून अनेक बालकीर्तनकार, महिला कीर्तनकार रोजगार मिळवताना दिसताहेत. 

बातमी, संहितालेखनातून रोजगारनिर्मिती 
प्रसारमाध्यमांची संख्या वाढत आहे. रोज एक नवीन वर्तमानपत्र, दूरदर्शनवर अनेक वाहिन्या, मालिका व चित्रपटांची संख्या वाढते आहे. त्यातून अनेक बातमीदार पत्रकार, मुद्रितशोधक, संहितालेखक, पटकथालेखक यांची नाविन्यतेसाठी गरज भासू लागली आहे. रसिकांच्या पसंतीच्या लेखनकौशल्यांची गरज वाढली आहे. त्यामुळे रसिक, प्रेक्षक चांगल्या वाहिन्या, मालिकांना व पटकथांना नेहमीच डोक्यावर घेत आला आहे. ग्रामीण भागातील तरूणाने लिहिलेली कथा, मालिका किंवा चित्रपटाचा विषय बनू शकते, याची अनेक उदाहरणे आहेत. स्थानिक वर्तमानपत्रात वाढ होत असल्याने अनेक तरूण बातमीदार झाले आहेत. जाहिरातलेखक स्तंभलेखन, संहिता लेखन यातून नवनवीनपणा दिला तर रसिक नक्कीच त्याला पसंती देतील. म्हणून अशातूनच चांगले निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक निर्माण होत आहेत. प्रेक्षकांची रसिकता लक्षात घेऊन अनेक तरूणांनी लेखनकौशल्यावर भर दिला तर रोजगार नक्कीच मिळू शकेल असे मला वाटते. 

मराठी भाषा दिन विशेष : कारण I LOVE मराठी!

मराठी भाषा व साहित्याचा आस्वाद आणि आकलन करत असताना अनेक रोजगार निर्मितीचे धडे गिरवता येतात. हे जर वेळीच समजले तर अनेक निवेदक, सूत्रसंचालक, मुद्रितशोधक, कथाकथनकार, वक्ते, प्रवचनकार, निरूपणकार, कीर्तनकार, लेखक, पटकथाकार निर्माण होतील.

प्रा. जवाहर मोरे, सोलापूर