पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी भाषा दिन विशेष : अभिमन्यू आणि रिप व्हॅन व्हिंकल...

मराठी भाषा दिवस. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आज मराठी भाषा दिवस. कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रम आयोजित केले जातील. मराठी दिनाचे औचित्य साधून मातृभाषेचे गुणगान गायले जाईल. स्वभाषेच्या नावाने नसलेल्या किंवा बासनात ठेवलेल्या अस्मितांचे देव्हारे माजवण्यात येतील. इतरांच्या भाषेपेक्षा माझी भाषा श्रेष्ठ कशी, याची जुनीच उजळणी पुन्हा नव्याने म्हटली जाईल. भाषणे होतील, चर्चा होतील आणि दिवसाच्या शेवटी 'एक दिवस' पाळल्याचा सुस्कारा सोडत मंडळी घरी परततील. मात्र या सगळ्यातून मराठीच्या हातात (किंबहुना पदरात) काय पडेल, हा प्रश्न विचारण्यास सगळेच विसरतील.

मराठी भाषा दिन विशेष : लोकसंस्कृतीतून भाषेचा आविष्कार

या विसरण्यातून आठवले स्मृती आणि विस्मृतीच्या दोन कथा. एक अभिमन्यू आणि दुसरा रिप व्हॅन व्हिंकल. एक शतकानुशतकांच्या पौराणिक परंपरेतून आलेला आणि दुसरा वसाहतवादातून आलेल्या साहित्यिक परंपरेतला. एक जन्मापूर्वीपासूनच आठवणी गोळा करत त्यांचा ऐन कसोटीच्या प्रसंगी उपयोग करणारा तर दुसरा अवचित झोपेच्या अधीन होऊन दोन दशकांनी जागा होणारा. एक स्वपराक्रमाने अजरामर झालेला आणि दुसरा स्वतःच्याच अस्तित्वाबाबत गोंधळलेला.

आधी अभिमन्यूची गोष्ट. चंद्रवंशात जन्मलेला अभिमन्यू अर्जुन व सुभद्रेचा मुलगा. मातेच्या गर्भात असतानाच अभिमन्यूने आपला मामा श्रीकृष्णाच्या मुखातून निरनिराळे व्यूह भेदण्याचे आणि रचण्याचे धडे घेतले. मकरव्यूह, कूर्मव्यूह, सर्पव्यूह हे व्यूह भेदण्याचे पूर्ण ज्ञान त्याला मिळाले. मात्र सुभद्रेला झोप आल्यामुळे चक्रव्यूह भेदण्याचे तेवढे ज्ञान त्याला मिळविता आले, त्यातून बाहेर पडण्याचे नाही.

याच्या उलट रिप व्हॅन व्हिंकल. वॉशिंग्टन इरव्हिंग या अमेरिकी लेखकाची रिप व्हॅन व्हिंकल ही एक छोटी कथा आहे. ती प्रकाशित झाली १८१९ मध्ये म्हणजे पेशवाई नष्ट झाल्यानंतर (म्हणजेच मराठी राज्य अंतर्धान पावल्यानंतर) एका वर्षाने. वसाहतकालीन अमेरिकेत राहणाऱ्या रिप व्हॅन व्हिंकल या डच-अमेरिकी गावकऱ्याची ही काल्पनिक कहाणी. बायकोच्या कटकटीला वैतागलेला रिप व्हॅन व्हिंकल कॅट्सकिल पर्वतावर (दारू पिऊन) झोपी जातो आणि तब्बल २० वर्षांनंतर जागा होतो. त्यातच इंग्रजांच्या तावडीतून अमेरिकेची मुक्तता आणि अमेरिकेत स्थापन झालेली लोकशाही अशा महत्त्वाच्या घटना त्याच्या अपरोक्षच घडतात. तो आपल्या गावी परततो तेव्हा तेथे कोणालाही तो ओळखत नाही. तो निवडणुकीनंतर लगेचच गावात परततो. त्याने मतदान कसे केले, हे लोक विचारतात. आयुष्यात कधीच मतदानाचा हक्क बजावलेला नसल्यामुळे त्याला या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. अमेरिकन क्रांती घडली आहे याची जाणीवच त्याला नसते.

मराठी भाषा दिन विशेष : मराठीपुढील आव्हाने व उपाय

आज मराठी अशा वळणावर उभी आहे, की या दोन व्यक्तिमत्वांपैकी कोणते तरी एक व्यक्तिमत्व तिला धारण करावे लागणार आहे. ते कोणाचे असावे, याबाबत मराठी जनांचा गोंधळ उडालेला नाही का? एकीकडे आईच्या गर्भातून आलेली आणि आयुष्याशी नाळ जोडणारी मातृभाषा. दुसरीकडे स्वतःचाच विसर पडेल अशी क्षणिक मौज. अभिमन्यू होऊन भाषेच्या कुरूक्षेत्रात उतरायचे का व्हॅन व्हिंकल होऊन कुठल्याशा धुंदीत जगायचे, हा पर्याय मराठी भाषेसमोर व ती भाषा बोलणाऱ्यांच्या समोर आहे.

मराठी का शिकत नाही, इंग्रजीचा एवढा सोस का हा प्रश्न विचारला की सर्वांचे उत्तर एकच असते. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्रजी यायलाच पाहिजे. हरकत नाही. शिका इंग्रजी, पण इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. इंग्रजी असो किंवा अन्य कोणतीही भाषा - ती स्वभाषेचा दुःस्वास, तिरस्कार करायला शिकवत नाही किंवा स्वभाषा सोडायलाही सांगत नाही. तरीही मराठी जनांना रिप व्हॅन व्हिंकल होण्याच्या ध्यासाने पछाडले आहे जणू. त्यांना स्वतःची भाषा विसरायची आहे, स्वतःचा भवताल मागे सारायचा आहे. जे जे आपले ते नको, जे जे परके ते हवे अशी काहीशी त्यांची धारणा आहे.

मराठी भाषा दिन विशेष : कारण I LOVE मराठी!

योगायोग म्हणा की आणखी काही, पण आधुनिक विज्ञान मात्र आपले वजन अभिमन्यूच्या पारड्यात टाकत आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी मातृभाषा व्यक्तीपासून दूर नेता येत नाही. प्रसिद्ध अमेरिकी भाषातज्ज्ञ नोआम चोम्स्की यांनी मांडलेला 'सिंटॅक्टिक स्ट्रक्चर' हा सिद्धांत भाषाशास्त्रात महत्त्वाचा मानला जातो. त्यात त्यांनी म्हटले आहे, की भाषेचे आकलन हे आनुवंशिकीवर (जेनेटिक्स) अवलंबून असते. काही भाषिक रचना बालकाच्या मेंदूत रेखाटलेल्या असतात. त्यामुळे विशिष्ट संस्कृतीतील बालकांना विशिष्ट भाषा समजण्यात कोणतीही अडचण येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मातेच्या गर्भात असताना बालकांना भाषा समजू शकतात, असे ताज्या संशोधनातूनही दिसून आले आहे. किंबहुना एखादी भाषा न शिकताही, तिचा गंधही नसतानाही दुसरी भाषा बोलू शकणाऱ्या व्यक्तींची अनेक प्रकरणे मानसशास्त्रज्ञांनी नोंदवलेली आहेत. अशा प्रकारे परकीय भाषा बोलण्याच्या क्षमतेला इंग्रजीत झेनोग्लोसी किंवा झेनोग्लोसिया (xenoglossy किंवा xenoglossia) हा शब्द आहे. माणसाच्या पूर्वजन्माशी त्याचा संबंध जोडण्यात येतो. याच क्षमतेला संस्कृतमध्ये 'जातिस्मर' असा शब्द आहे.  

याबाबतीत श्री अरविंदांचे (योगी अरविंद घोष) उदाहरण पाहण्यासारखे आहे. बाल अरविंदांवर कुठलेही भारतीय संस्कार होऊ नयेत, भारतीय संस्कृतीचा वाराही त्यांना लागू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लंडला पाठवले. तब्बल १४ वर्षे त्यांना मातृभूमीपासून, मातृभाषेपासून दूर ठेवण्यात आले. तरीही त्यांच्यातील भारतीयत्व गेले नाही. स्वभाषेबाबतचा त्यांचा जिव्हाळा गेला नाही. इंग्लंडमध्ये असतानाही त्यांची बंगाली व संस्कृत भाषेची ओढ कायम राहिली. भारतात परतल्यावर ते 'साहेब' न राहता भारतीयच राहिले. इतकेच नाही तर भारतीय व्यक्तीलाही न लाभणारी योगसिद्धी त्यांना लाभली.

मराठी भाषा दिन विशेष : अयो रामा रामा... लफड्यात फसलो ना...!!!

याचा अर्थ काय? मायबोली किंवा मातेची भाषा रक्तातच असते. तिच्यावर परभाषेचे सिंचन केल्याने त्या भाषेतील कौशल्य येईलही, मात्र मातीचा गुण म्हणतात तो काही जात नाही. थोडक्यात म्हणजे अभिमन्यू होणे हाच मराठीजनांसमोरचा पर्याय होय. भाषेचे जर महाभारत होत असेल (सध्याच्या व्यापारीकरणाच्या काळात ते होत आहे), तर अभिमन्यू होऊन मैदानात उतरणे हाच मार्ग आहे. व्हॅन व्हिंकल होऊ पाहण्याऱ्यांची गत हेही नाही अन तेही नाही अशीच होण्याची शक्यता जास्त. अस्सल मराठीत सांगायचे तर तेलही जाईल आणि तूपही!

- देविदास देशपांडे 
devidas.desh@didichyaduniyet.com