पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठी भाषा दिन विशेष : लोकसंस्कृतीतून भाषेचा आविष्कार

मराठी भाषा दिन विशेष : लोकसंस्कृतीतून भाषेचा आविष्कार

मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यात इथल्या नागर संस्कृतीपेक्षा लोकसंस्कृतीचा वाटा अधिक आहे. लोकसंस्कृतीतील विविध सण-उत्सवात होत असलेल्या विविध विधी-कुळाचारातून भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आला. शेती-मातीशी निगडित इथल्या संस्कृतीत सामान्य माणसाने परंपरेने आलेल्या लोकगीत, लोककथा आणि परंपरांचा स्वीकार केला. यामध्ये प्रत्येकवेळी भर घातली. तो समूहमनाचा आविष्कार असल्याने समाजाचे प्रतिबिंब त्यात पडले. याच लोकसंस्कृतीचा धागा धरून पुढे महानुभाव, वारकरी, दत्त, नागेश संप्रदायात साहित्याचे लेखन झाले. यामध्ये सर्वात महत्त्वाची साहित्य परंपरा जी लोकांच्या जगण्याचा भागच बनली. ती म्हणजे वारकरी परंपरा. भेदाभेद ब्रह्म अमंगळ असे म्हणणारी ही परंपरा होती. प्रत्येक जात आणि धर्मातील संत या परंपरेत होते. प्रत्येकाची एक संस्कृती अभंगाच्या माध्यमातून पुढे आली. संतांनी लोकमनाचा विचार केला. आणि इथल्या अनिष्ट परंपरांवर प्रहारही केले. भक्ती आणि समाज प्रबोधनाची वीण वारकरी आणि विठ्ठलात संतांनी घट्ट विणली. त्यातून कीर्तन, भजन, गवळण, भारूड, ओवी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अभंग. याच्या माध्यमातून भाषा समृद्धी झाली. पुढे लोकांच्याच भावना, विचार हे भक्ती आणि मनोरंजनाच्या माध्यमातून आविष्कृत झाले. त्यामुळे लोकभाषेचा समन्वय भक्तीशी आणि विचारांशी साधला गेला. तेच अभंग, गवळणी ओव्या, भारूडे आजही गायली जातात. ते भाषा संवर्धन आणि समृद्धेत भर घालणारे ठरले. ठरत आहे.

मराठी भाषा दिन विशेष : अयो रामा रामा... लफड्यात फसलो ना...!!!

लोकसाहित्याने इथल्या साहित्याचा पाया घातला. लोकनाट्यातून नाटक, अभंग, गवळणी आणि ओव्यांमधून कविता, लोककथेतून आजची कथा जन्माला आली. अलीकडच्या साहित्यात प्रवाह आणि प्रतिकांची भर पडली असली तरी या साहित्याची पायाभरणी लोकसाहित्यातूनच झाली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. लोककलांच्या माध्यमातूनच आजच्या कलाही समृद्ध झाल्या. भलरी गीते, शेतकरी गीते, मोटेवरची गीते यांच्या माध्यमातून लोकांचे श्रम हलके करण्याचे काम झाले.

लोकसंस्कृतीच्या उपासकांनी मराठी भाषा समृद्ध केली. पहाटे येणारा पांगुळ इथंपासून ते रात्री कीर्तनात एखादे महाराज भक्तीचे ज्ञानामृत पाजत असतात तिथंपर्यंत. आज आपल्याकडे भाषा संवर्धनाचे गोडवे गायले जात आहेत. मात्र खरी भाषा संवर्धित केली होती ती लोकसंस्कृतीच्या उपासकांनी. प्रत्येक वळणावर नवे रूप धारण करून ती पुन्हा तजेलदार आणि तरुण झाली. नदीने नाले, ओढे आपल्यात सामावून आपला प्रवाह समृद्ध करावा तसेच प्रत्येक टप्प्यावर विविध भाषांतील शब्द सामावून घेत मराठी समृद्ध झाली. लोकलपासून ग्लोबलपर्यंत भाषेची रूपं कशी पालटली. पण आपला बाज आणि ढंग तिने सोडला नाही.

मराठी भाषा दिन विशेष : भाषेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधी

पांगुळ संस्कृती जपत भल्यापहाटे कंदील घेऊन लोकांना भविष्य सांगण्यासाठी येत असे. त्याबदल्यात मिळेल ते धान्य तो घेऊन जात असे. इथली सासुरवासीण भल्या पहाटे जात्यावर बसून ओव्या गायची. मनातील वेदनांना वाट करून द्यायची. ही परंपरा मौखिक रूपाने पिढ्यानपिढ्या सुरू राहिली. कुडमुड्या जोशी, नंदीबैलवाला, माकडवाला, अस्वलवाला यांनीही आपली कला सादर करत असताना लोकभाषेचा वापर केला. परिणामी त्यांनी सांगितलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान लोकांपर्यंत सहज पोहोचलं.

मराठी भाषा दिन विशेष : मराठीपुढील आव्हाने व उपाय

बहुरूपी हे ज्ञानाबरोबर मनोरंजनाचं ते एक चालतं बोलतं विद्यापीठच होतं. ते शब्दबंधातून लहानांपासून वृ़द्धांपर्यंत आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच मनाचा ठाव घेत. त्यातील रुपकांमुळे भाषेला बहार आलेला दिसतो. पुढे अनेकविध साहित्यप्रवाह आले. ग्रामीण, दलित, स्त्रीवादी, लोकसाहित्य, विज्ञानवादी, आदिवासी आणि अलीकडे पर्यावरणीय साहित्य प्रवाह आले आणि मराठी भाषा समृद्ध करत गेले.

लोकसाहित्याने माणसांना समृद्ध केले
कीर्तन प्रवचनांतून सामान्यांना भक्ती आणि तत्त्वज्ञानाचे अमृत लोकभाषेत, बोलीभाषेत पाजण्याचे काम वारकरी सांप्रदायाने केले. सामान्याच्या जगण्याचा एक भागच संतसाहित्य होऊन गेले. गवळणी, भारूड, ओवी, अभंग याने मराठी भाषेलाच नव्हे तर मराठी साहित्य आणि मराठी माणसालाही समृद्ध केले.

मराठी भाषा दिन विशेष : कारण I LOVE मराठी!

संस्कृतीचे दर्शन
महाराष्ट्राच्या मातीत कीर्तनाच्या फडाबरोबर लावणीचे फडही रंगले. तमाशाच्या फडात लावणी बहरली. तिने मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवले. शृंगार आणि मनोरंजन या बरोबरच स्त्रीच्या लावण्याची चंद्रकोर उमटली ती या मराठी मनात आणि मातीत. शृंगाराबरोबर पोवाड्याच्या माध्यमातून शाहिरी बहरली. कीर्तिवंतांचा जाज्वल्य इतिहास वीररसाच्या माध्यमातून व्यक्त झाला. लोकसंस्कृतीचे दर्शन या साहित्यातून दिसते.

प्रा. विजय साळवे, सोलापूर