'अयो रामा रामा... लफड्यात फसलो ना...!!!' अशोक सराफ आणि अरुणा इराणी यांच्यावर चित्रत झालेलं हे गाणं आठवतंय का? तसंच 'ओ रुक्मिणी तू आणि कशाला आली गे इकडे?' हा अशोक सराफ यांचा डायलॉग आठवतोय का तुम्हाला? 'चंगू-मंगू' या मराठी चित्रपटातील बेळगावी भाषेची ही झलक. मराठी सिनेमा असो वा मालिका कानडी पात्र रंगवायचं म्हटलं की असे संवाद हमखास एकायला मिळतात. सीमा भागातील मराठीचे हे एक सर्वसाधारण चित्र आपल्याला लक्षात येतं. मग लगेच आपण सरसकट बेळगावी मराठी असा त्याचा समज करुन घेतो. मात्र, ही सीमा भागातील किंवा बेळगावची मराठी नाही. तर ही कन्नड लोकांकडून बोलली जाणारी मराठी आहे.
स्टीव्हच्या चेहऱ्यावर पुन्हा 'कॅप्टन्सी'चं स्मित हास्य दिसणार
बेळगावची मराठी ही याहून खूप वेगळी असून, त्याचा लहेजा हा चंदगडीशी साधर्म्य साधणारा आहे. मात्र, चित्रपट, मालिका, गाणी अशा माध्यमातून तिचे सर्वसाधारणीकरण करण्यात आल्याने सर्वांचाच हा एक गोड गैरसमज आहे की कानडी हेल काढून बोलली गेलेली ती बेळगावी अथवा सीमा भागातील मराठी. आज (२७ फेब्रुवारी) मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण याच बेळगावी मराठी बोलीभाषेबद्दल थोडसं विस्ताराने जाणून घेऊया.
बेळगाव हा तसा मराठी बोलणाऱ्या लोकांचाच प्रदेश. कारवारपासून ते निपाणी व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचा प्रदेश हा पूर्वीपासून बेळगाव जिल्ह्याचा भाग राहिलाय. मात्र, नंतर भाषावार प्रांतरचनेत बेळगाव कर्नाटकाला तर चंदगड कोल्हापूरला जोडला गेला. त्यानंतर येथील मराठी भाषेवर मोठ्या प्रमाणात कन्नडचा प्रभाव पडत गेला. मग कानडी लोकांकडून बोलली जाणारी मराठी ही विशिष्ठ हेल काढून कानडीची री ओढत बोलली जाऊ लागली. त्यामध्ये कानडी भाषेतील व्याकरण, लिंगभाव व उच्चार पद्धतीचा अंतर्भाव होत गेला. पुढे त्याच भाषेला इतर माध्यामातून बेळगावी मराठी म्हणून ओळखले जाऊ लागले. वास्तविक पाहता बेळगाव भागामध्ये बोलली जाणारी मराठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये बोलली जाणारी चंदगडी यामध्ये फारसे अंतर नाही. मुळात या दोन्ही भाषा एकच आहेत. मात्र, चंदगडी भाषेचे बोलीभाषा म्हणून संवर्धन करण्यात आल्याने त्याला मान्यता मिळत गेली. त्याउलट बेळगावची बोलीभाषा ही कानडीच्या प्रभावाखाली आल्याने तिचा एक प्रकारे ऱ्हास होत गेला. त्यामध्ये सरकारी अनास्था, स्थानिक नागरिकांकडून झालेले दुर्लक्ष आणि माध्यमातून झालेली या भाषेची चुकीची प्रतिमा यामुळे बेळगावी बोली भाषा ही एकप्रकारे आता संकटात सापडली आहे.
टी-२० विश्वचषकात शतकासह या महिला खेळाडूनं रचला अनोखा विक्रम
याबाबत येथील मराठी लोकांमध्ये हळूहळू अनास्था निर्माण होत असल्याचे बेळगावमधील अनेक मराठी भाषेचे जाणकार हे स्पष्टपणे कबूल करतात. तर इथल्या बोली भाषेचे संवर्धन होण्याची गरजही व्यक्त करतात.बेळगाव जिल्ह्यामध्ये विभागवार वेगवेगळ्या पद्धतीची मराठी बोली बोलली जाते. कारवारच्या बाजूला असलेल्या भागात या मराठीवर कोकणीचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. तर चंदगड तालुक्याच्या जवळील प्रदेशामध्ये चंदगडी बोलीच बोलली जाते. निपाणीच्या दिशेला गेल्यास आपल्याला कोल्हापुरी मराठी बोलल्याचे दिसून येते. संकेश्वर किंवा अथणी या भागात कन्नडचा अधिक प्रभाव असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या विभागवार मराठी भाषेतील उच्चार आणि हेल हा बदलत जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. संकेश्वर अथवा कन्नडचा प्रभाव अधिक असलेल्या प्रदेशात सर्रास लिंगभावाचा गोंधळ झाल्याचे आपल्याला ऐकायला मिळेल. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला, वस्तूला लिंग न पाहता नपुसकलिंगी उद्देशून बोलले जाते.
उदा. अरे ते गाडीत बुसून जातो बघ मी.
तर काही भागात स्त्रियादेखील पुरुषांप्रमाणे पुलिंगी उच्चार करुनच बोलतात.
उदा. मी जेवतो बघ. मी आता उद्याला येतो बघ. मी जातो बघ.
काही ठिकाणी 'बे' हा प्रत्येय लावला जातो. ज्यातून आपल्याला विदर्भातील मराठी बोलल्याचा भास होतो.
उदा. काय करुल्यास बे, तू कुटे गेल्यास बे, कन् आला बे एवढ्या उशिरा...
कोकणाकडे कोकणी प्रभाव दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने कारवारी भाषेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. तसेच चंदगड तालुक्याच्या बाजूला इस, उस, लोय, लई असे प्रत्येय लागून उच्चार केले जातात.
उदा. तुझ आधीच सांगुलोय, जत्रेस यऊस पाईजे बघ.
अशा प्रकारे गोवा, कोकण, चंदगड, कोल्हापूर आणि कन्नड प्रदेशाचा बेळगावच्या बोलीवर वेगवेगळा प्रभाव पहायला मिळतो. त्यानुसार तिथले उच्चार आणि बोलण्याची पद्धत रुढ झालेली आहे. मुख्यतः बेळगाव तालुका आणि आसपासच्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते ती बोली चंदगडीशी साधर्म्य असणारीच आहे. किंबहुना ती एकच असल्याचे मराठीचे अभ्यासक व शिक्षक रणजित चौगुले सांगतात.
त्यामुळे चंदगडी भाषेला वेगळे म्हणणे म्हणजे इथल्या भाषेवर अन्याय करण्यासारखेच आहे. मुळात हा पूर्वी एकच प्रदेशाचा भाग असल्याने हीच मुळ बोली असल्याचे चौगुले सांगतात. तसेच कन्नडची सक्ती, इंग्रजी माध्यमाचे वाढते प्रमाण आणि साहित्य इतर ठिकाणी बेळगावी मराठीचा अभाव यामुळे बेळगावी मराठी बोली भाषेचे नुकसान होत असल्याची खंतही चौगुले सरांनी बोलून दाखवली. प्रामुख्याने साहित्यात इथल्या बोलीचा समावेश खूप कमी झाला आहे. रणजित देसाई, प्रकाश संत, 'बेरड'कार भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या लेखकांच्या लेखनात काही प्रमाणात इथल्या भाषेचा अंतर्भाव दिसतो. मात्र, सर्रास प्रमाण भाषेचाच वापर होत असल्याने जशा पद्धतीने भाषेचे जतन व्हायला पाहिजे ते होऊ शकले नाही. आताही बेळगावी बोली टिकवण्याबाबत उदासीनताच दिसून येते. त्यात पूर्वीच्या पिढीतील लोक तसेच ग्रामीण भागातच ही भाषा बोलली जाते. आता शाळेमध्ये कन्नड सक्ती, व्यवहाराची भाषा इंग्रजी, कन्नड आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये त्रिभाषा सूत्राचा वापर झाल्याने नविनच हायब्रिड भाषा निर्माण झाली आहे. यातून भाषेचे तर नुकसान होतच आहे. मात्र, लहान मुलांचेही नुकसान होत असल्याचे इथले जाणकार सांगतात.
रशियन सुंदरीचा टेनिसला अलविदा!
दुसऱ्या बाजूला बेळगावी मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पूर्वीपासून काही संस्था काम करत असल्याचेही आपल्याला दिसून येते. त्यामध्ये १७२ वर्षे जुनी सार्वजनिक वाचनालय असो वा अलिकडे निर्माण झालेले लोकमान्य वाचनालय असो यांनी मराठी भाषिकांची वाचन संस्कृती टिकवण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे सरस्वती वाचनालय, वाड़मय चर्चा मंडळ, विद्या वाचनालय, वि. गो. साठे प्रबोधिनी यांच्या माध्यमातून वर्षभर विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनाचे काम केले जात आहे.
दरम्यान, सर्वात जुनी असलेली सार्वजनिक वाचनालय ही संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवून मराठी वाचनाची चळवळ पुढे नेत आहेत. वाचनालयाच्या माध्यमातून मोफत वाचन विभाग चालवला जातो. दररोज हजारो लोक याचा लाभ घेतात. त्याचबरोबर ८० हजारावर मुबलक पुस्तकांचा संग्रह या वाचनालयात असून त्यातून अविरत वाचन सेवा दिली जात असल्याचे व्यवस्थापक व्ही. एल. कडगावकर यांनी सांगितले. लोकमान्य वाचनालयाच्या माध्यमातूनही वाचन संस्कृती जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून पुस्तक पेटी सारखा उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये दर आठवड्याला सीमाभागातील मराठी शाळांमध्ये दर मंगळवारी कथाकथन, पुस्तक वाचन, चर्चासत्र, मराठी पुस्तकांवर प्रश्नोत्तर मालिका चालवली जाते. त्यातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करुन मराठीची गोडी लावण्याचा प्रयत्न असल्याचे लोकमान्य वाचनालयाचे कार्याध्यक्ष अशोक याळगी यांनी सांगितले. ग्रंथालयामार्फेत मराठीच्या संवर्धनासाठी साहित्य निर्मितीला मदत, पुस्तक प्रकाशन, पुस्तक वाटप असे उपक्रम घेतले जात असल्याचेही ते म्हणाले.
अलिकडच्या काळात चंदगडी भाषेप्रमाणेच बेळगावी बोली भाषेला मान्यता मिळावी. याची राज्य, देश पातळीवर नोंद घेतली जावी यासाठी काही लोकांसह संस्थाही प्रयत्नशील आहेत. त्यामध्ये विद्यानिकेत शिक्षण संस्थेतील वि.गो. साठे प्रबोधिनीच्या माध्यमातून बेळगावी मराठीला बोली भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे सरांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाची मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण या बोलीसंदर्भात संशोधन, शब्द संग्रह व संदर्भ सूची तयार करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी मराठी राज्य साहित्य, संस्कृती मंडळ तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मराठी भाषा दिन विशेष : मराठीपुढील आव्हाने व उपाय
या संपूर्ण प्रकल्प आणि बेळगावी मराठी बोलीच्या संवर्धनाबाबात इंद्रजित मोरे म्हणाले की, मराठीमध्ये ५२ प्रचलित प्रमाणीत बोलीभाषा आहेत. तर विस्ताराने पाहिले तर ९४ बोलीभाषा आढळतात. यामध्ये बेळगावी बोलीभाषेचा समावेश केला जातो. मात्र, बेळगावी बोलीभाषेवर काम करण्याची अजूनही गरज आहे. त्यासाठी संशोधन, संकलनाचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी वि. गो. साठे प्रबोधिनीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यासाठी सविस्तर संशोधन प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात येणाऱ्या सीमाभागातील सर्वच ५७५ गावांचा सविस्तर अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर सीमाभागात येणाऱ्या निपाणी, कारवार, संकेश्वर अशा इतर प्रशासकीय विभागातील बोली भाषेचा अभ्यास करुन मुख्य बेळगावी मराठी बोलीचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा विचार आहे. त्यासाठी या सर्वच गावांमध्ये सर्वेक्षण, मुलाखती घेतल्या जातील. त्यासाठी प्रश्नावली तयार करुन पुराव्यानिशी व्हिडिओ आणि शब्दांचे संकलन करण्यात येणार आहे.
मराठी भाषा दिन विशेष : लोकसंस्कृतीतून भाषेचा आविष्कार
बेळगावी बोलीभाषेचा अभ्यास करण्यामागे या मराठी बोलीला स्वतःची अशी ओळख मिळवून देणे हा मुख्य हेतू आहे. मराठी भाषा जर विहीर असेल तर बोलीभाषा या झऱ्याप्रमाणे काम करतात. त्यामुळे बोलीभाषा टिकवणे गरजेचे आहे. तसेच बेळगावी मराठीला बोलीभाषेचा दर्जा मिळाल्यास या भाषेत साहित्य तयार होण्यास मदत होईल. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश होऊन त्याचा अभ्यास केला जाईल. त्याचबरोबर बेळगावी बोलीच्या संवर्धनासाठी अनुदानाच्या माध्यमातून शासकीय स्तरावर मदत मिळण्यास मदत होईल. यातून बेळगावी बोली टिकवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रा. मोरे यांनी सांगितले.