पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महावितरणची 'कोरोना'तली कर्तव्यनिष्ठा

कोरोनाच्या संकटाला न डगमगता संसर्ग टाळण्याची खबरदारी घेऊन महावितरणचे जिगरबाज कर्मचारी कर्तव्य बजावत

अन्न, वस्त्र व निवाऱ्यासारखीच वीज ही मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय जगण्याची कल्पना करणे शक्य नाही, इतके तिचे महत्त्व आहे. सध्या जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केल्याने सर्वांना घरात राहावे लागत आहे. अशावेळी महाराष्ट्रातील जनतेला घरात राहणे सुसह्य व्हावे यासाठी सुरळीत वीजपुरवठा करत आहेत महावितरणचे अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी. कोरोनाच्या संकटाला न डगमगता संसर्ग टाळण्याची खबरदारी घेऊन महावितरणचे जिगरबाज कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. 

वायफळ खर्च टाळा, काटकसर करा, शरद पवार यांचा सल्ला

प्रतिकूल परिस्थितीतही काम 

कोरोनाचे संकट कमी होते की काय, तोच गेल्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या ठिकाणी महावितरणचे अभियंते, कर्मचारी धावले आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर केले. भर पावसात चिखल तुडवत बिघाड शोधण्यासाठी त्यांनी पायपीट केली. तसेच रात्री-अपरात्री बॅटरीच्या व वाहनांच्या हेडलाईटच्या उजेडात काम केले. ते केवळ ग्राहक अंधारात राहू नये म्हणून. 

'डॉक्टरांचे प्रेस्क्रिप्शन असलेल्यांना मद्य द्या'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक खासगी तसेच सरकारी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा सरकारने दिली आहे तसेच लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरी बसावे लागले आहे, त्यांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता, संचालक दिनेशचंद्र साबू, संचालक ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) पवनकुमार गंजू यांच्यासह वरिष्ठ व स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी प्रभावी नियोजन केल्याने आणि क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे महावितरणला शक्य झाले आहे. 

कार्यपद्धतीत केला बदल

वीज ही अत्यावश्यक बाब असल्याने तिचा अखंडित पुरवठा ठेवण्यासाठी महावितरणने आपल्या कार्यप्रणालीत महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकारला आरोग्यविषयक खबरदारी घेता यावी यासाठी अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. तांत्रिक किंवा इतर कारणाने खंडित झालेला विद्युतपुरवठा युद्धपातळीवर प्रयत्न करून तात्काळ पूर्ववत करण्यात येत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार राज्यात वीजविषयक कार्यप्रणालीत बदल करून विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार महावितरणने मिटर रीडिंग आणि वीज बिलांचे काम तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवून सरासरी वीज बिले देण्याचा निर्णय घेतला आहे. वस्तुत: सरासरी वीज बिले देण्याचा प्रयोग महावितरणसारख्या वाणिज्यिक व्यवस्थापनास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. मात्र, कोरोना संकटावर मात करण्यासाठी उपयुक्त आणि अत्यांतिक गरजेचा आहे.

लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार का ? कॅबिनेट सचिव म्हणाले...

ऊर्जामंत्री राऊत यांच्याकडून कौतुक

या आणीबाणीच्या परिस्थितीत महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलिस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी व अधिकारी यांचेही योगदान प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. वीज कंपन्यांनी अखंडित् वीजपुरवठा केल्यामुळेच सरकारला जनतेला घरात थांबविणे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या कामगिरीबद्दल ऊर्जामंत्र्यांनी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तोंडभरुन कौतुक करत वीज कर्मचारी प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले आहे. नागपूर येथे शुक्रवारी दुरुस्तीचे काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन भेट घेतली आणि त्यांचा हुरूप वाढवला. 

लवकरच पाच मिनिटांत कोरोनाचा अहवाल देणारे टेस्ट किट, १०० रुपयांत चाचणी

ऑनलाईन सुविधा वापरा

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील काही दिवस वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीजपुरवठ्याशी संबंधित महावितरणच्या उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवेचा वापर करावा. महावितरणच्या २४ तास उपलब्ध ऑनलाईन सेवेचा घरबसल्या वापर करून वीज बिलांचा भरणा करता येणार आहे. तसेच त्यात ५०० रुपयांच्या मर्यादेपर्यंत बिलावर ०.२५ टक्के सवलत देण्यात येत आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर, महावितरण मोबाईल ॲपवरून सर्व लघुदाब ग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकीग, मोबाईल वॉलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध ऑनलाईन सुविधेबाबत महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल या विभागात ग्राहकांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना स्वतःच आपले मीटर रीडिंग पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. महावितरणच्या ग्राहकांना १८००-१०२-३४३५ / १८००-२३३-३४३५ /१९१२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.