कोरोना विषाणूच्या बेरजेचे गणित आता गुणाकाराच्या दिशेने वाटचाल करत आहे. वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला निश्चय, संयम आणि जिद्दीने कोरोना विषाणूविरोधात लढायचे आहे. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर असून आपण सर्वांनी मिळून कोरोना विषाणूला गुणाकारापासून रोखून त्याची वजाबाकी करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी लागू : उद्धव ठाकरे
ते पुढे म्हणाले की, रविवारी 'जनता कर्फ्यू'च्या वेळी तुम्ही जो संयम दाखवला तो संयम आपल्याला आणखी काही दिवस दाखवायचा आहे. सरकारने सर्व परीक्षा रद्द केल्या असल्या तरी सध्याचा काळ हा आपल्या सर्वांच्या परीक्षेचा काळ आहे. संयम आणि जिद्दीने या कोरोनाशी लढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले.
लोकल, एक्स्प्रेसबरोबर आता एसटी सेवाही बंद!
राज्यातील कोरोनग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता कोरोना संदर्भातील चाचणी केंद्र वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली. अत्यावश्यक सेवा वगळता नाइलाजास्तव सरकारला जमाव बंदीचे आदेश द्यावे लागत आहेत. याकाळात सरकारी कार्यालयात केवळ पाच टक्के कर्मचारी उपस्थितीत असणार आहेत. राज्याचा कारभार अल्प कर्मचाऱ्यांवर चालू राहणार असल्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढणार नाही, याची जनतेला खबरदारी घ्यावी लागेल, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.