पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेसाठी मनसेला सोबत घेण्यावरून विरोधकांमध्ये अद्याप एकमत नाही

महाराष्ट्रातील विरोधकांची बैठक

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्यानंतर आता राज्यातील विरोधी पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यात विधानसभेची सार्वत्रित निवडणूक होते आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईमध्ये विविध मुद्द्यांवर विचारमंथन केले. लोकसभा निवडणुकीत पराभवाची नेमकी कारणे काय, यावर बैठकीत चिंतन करण्यात आले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी काय रणनिती आखता येईल, यावरही विचार करण्यात आला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसला. अनेक जागांवर या आघाडीचे उमेदवार अपयशी ठरले. यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी करून घेण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीमध्ये सहभागी करून घ्यायचे की नाही, यावर अजून सर्व नेत्यांमध्ये एकमत झालेले नाही. काहींच्या मते राज ठाकरे यांना आघाडीत घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तर काहींच्या मते तसे करणे फायद्याचे ठरणार नाही. 

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून, राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

आता आठवड्यातून एकदा सर्व नेत्यांनी भेटायचे. त्याचबरोबर आघाडीतील जागा वाटपावर तातडीने चर्चा सुरू करायची हे बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी पुरेसा वेळ हातात मिळेल. प्रकाश आंबेडकरांना आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीवेळी ते आघाडीत येतील, असा विश्वास काही नेत्यांनी व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांना विरोधकांच्या आघाडीमध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण ते येतील असे वाटत नाही. कारण विरोधकांच्या उमेदवारांना फटका द्यायचा हा त्यांचा हेतू आधीपासूनच ठरलेला आहे. त्यांच्याशी चर्चा करायला आणि मागण्या पूर्ण करायला आम्ही तयार आहोत. पण ते प्रत्येकवेळी आपल्या मागण्या बदलतात, असा आमचा पूर्वानुभव आहे, असे राष्ट्रवादीतील एका नेत्याने सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी इच्छुक आहे. पण काँग्रेस नेते याबद्दल तयार नाहीत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत एवढ्या प्रचारसभा घेऊन त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास पुन्हा उत्तर भारतीय लोक काँग्रेसपासून दूर जातील, असे काही नेत्यांना वाटते.

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडून जाण्याची शक्यता

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, दुष्काळ, शेतकऱ्यांची आत्महत्या आणि आरक्षण या विषयावरून राज्यातील लोकांमध्ये सरकारबद्दल नाराजी आहे. लोकसभेचे निकाल हे कायम विधानसभेच्या निकालांपेक्षा वेगळे असतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत आम्ही विजय मिळवला होता.