पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात १६ पोलिस शहीद, महाराष्ट्रावर शोककळा

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला

राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जात असतानाच विदर्भात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोलीमध्ये दादापूर रोड येथे १६ पोलिस शहीद झाले आहेत. पोलिसांची कुमक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. शहीद झालेले सर्व पोलिस हे सी ६० पथकातील आहेत. हेच पथक नक्षलवादविरोधी कारवाईत महाराष्ट्रात सक्रीय असते. 

नागपूरपासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोर्चीमध्ये पोलिस पार्टी नक्षलवाद्यांविरोधात एका कारवाईसाठी निघालेली असताना त्यांच्याकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आणखी फौजफाटा घटनास्थळी पाठविण्यात आला आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे एएनआयने म्हटले आहे.

भामरागढमध्ये काही नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती मिळत आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार नक्षलवाद्यांनी पोलिसांची एकूण तीन वाहने उडविली. ही सर्व वाहने खासगी कंत्राटदाराची होती.

महाराष्ट्र पोलिस दलातील सी ६० पथकातील १६ पोलिस शहीद झाल्याचे ऐकून आपल्याला तीव्र दुःख झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भ्याड  हल्ल्याचा आपण निषेध करतो, असेही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या संपर्कात असून, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनाही महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.