लोकल टी-२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करण्यात माहीर असलेल्या एखाद्याला अचानक कसोटीत संधी मिळावी. संघावर संकट घोंगावत असताना नावाजलेल्यांचा संयम ढळल्याचं चित्र दिसत असताना नवख्यानं कसोटीत संयम दाखवून मैदानात नांगर टाकावा अन् सामन्याला कलाटणी मिळेल अशी आशा जागृत करावी, अशीच काहीशी खेळी कोरोनाच्या लढ्याचा सामना करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खेळताना दिसताहेत.
राजकारण बाजूला ठेवून मी माझे कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करतोय की नाही, ते तुम्ही ठरवायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या घडीला राजकारण करणाऱ्या लोकांना भानावर यायचा अप्रत्यक्ष सल्ला दिलाय. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी कौतुक केले. मै आपको सचमूच धन्यवाद देना चाहता हूं! मी हिंदीत यासाठी बोललो की गडकरींचे कौतुक केलेले वरपर्यंतही कळले पाहिजे, असे म्हणताना ठाकरे घराण्यातील शाब्दिक बाण्याचे दिलखुलास उदाहरण दिले.
मुंबई-पुण्यात १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून किंवा सभेत व्यासपीठावरुन केलेला शाब्दिक हल्ला हा महाराष्ट्रालाच नव्हे तर तमाम हिंदुस्थानला रोखठोक संदेश देणारा होता. शिवसेनेपासून वेगळी चूल मांडणाऱ्या राज ठाकरेंच्या शब्द भांडारातही अदभूत जादू पाहायला मिळते. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्या आक्रमक आणि मुद्देसूद भाषणाचा फायदा झालेला दिसला नाही, हा मुद्दा बाजूला ठेवला तर त्यांच्यामध्ये गर्दी जमवण्याची ताकद आजही आहे हे नाकारता येत नाही. ठाकरे घराण्याचा इतिहासाला उजाळा देण्याचे कारण सध्याच्या घडीला उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने संयमाने परिस्थिती हाताळताना दिसतात यातून ठाकरे घराण्याला आक्रमक शैलीशिवाय संयमी नेतृत्व लाभल्याची येणारी प्रचिती. उद्धव ठाकरे यांनी शिवधनुष्य हाती घेतले तेव्हा ते ठाकरे घराण्याचा आक्रमक अंदाज पुढे नेतील का?, असा प्रश्न अनेक शिवसैनिकांमध्ये होता. परिणामी काहींनी राज ठाकरेंसोबत जाणेही पंसत केल्याचे पाहायला मिळाले.
संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, CM ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरे यांच्या संयमी भाषणात वजनी मराठी शब्द ऐकायला मिळाले नाहीत, असे कधीच झाले नाही. भाषणातून वजनी शब्दाचा मारा करणे हा वारसा ठाकरे कुटुंबियांना लाभलाय, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. ज्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख झाल्यावर प्रश्न निर्माण झाले होते. तसेच प्रश्न ठाकरे घराण्यातून पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरही निर्माण झाले होते. त्यांना प्रशासकीय कामकाज करणे जमणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. नोकरी मिळाल्याशिवाय कोणालाच अनुभव येत नसतो. पण नोकरीला गेल्यानंतर अनुभव विचारतात तसे मुख्यंत्रीपदावर विराजमान होण्यापूर्वी त्यांच्या प्रशासकीय अनुभवाबद्दलही रंगणारी चर्चेत फारसं नवल वाटल नाही.
कितीही डोके फोडले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार: संजय राऊत
आज अवघा महाराष्ट्र त्यांच्या संयमी नेतृत्वाच्या प्रेमात पडावा, असे काम ते करताहेत. मराठी बाणा जपणारे मुख्यमंत्री हल्ली हिंदीमध्ये बोलण्यावर भर का देतात? असा प्रश्नही काहींना पडेल. शिवसेनेच्या मुखपत्राच्या भाषेत बोलायचे झाले तर उद्धव ठाकरे या चर्चाही वांजोट्या ठरवतील. कोरोना विषाणूने महाराष्ट्राला घातलेला विळखा हो खूपच चिंताजनक आहे. पण उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाखाली आपण हा सामना नक्की जिंकू, असे त्यांच्या आश्वासक शब्दांतून वाटते. हीच ती वेळी आहे घरात बसून राज्यालाच नव्हे तर देशाच्या विजयात मोलाचे योगदान देण्याची!
-सुशांत जाधव
Email -Sushantjournalist23@gmail.com
Twitter- @2010Sushj