पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Maharashtra Budget 2019 : अर्थसंकल्प आज दुपारी, लोकप्रिय घोषणांची शक्यता

सुधीर मुनगंटीवार

सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मंगळवारी दुपारी विधीमंडळात सादर होणार आहे. येत्या तीन महिन्यांत राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होते आहे. त्यामुळे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेमध्ये राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दुपारी दोन वाजता विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात अर्थसंकल्प मांडला जाईल.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर करण्यात आला. राज्याच्या आर्थिक विकासाच दर यंदाही साडेसात टक्के राहिल, असा अंदाज पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्याचवेळी राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान असलेल्या कृषी आणि उद्योग या दोन्हींच्या दरात घट होण्याची स्थिती असल्याचे पाहणी अहवालात म्हटले आहे. गेल्यावर्षी राज्यातील बहुतांश भागात अपुरा पाऊस पडल्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर गेल्या चार वर्षात अपेक्षित पाऊस पडलाच नसल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या सगळ्याचा परिणाम राज्याच्या विकासदरावर होणार असल्याचे दिसते आहे.

विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे अर्थसंकल्पात सामान्यांसाठी विविध योजना किंवा सवलती जाहीर करण्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. केंद्रात ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर आले आहे. त्याचप्रमाणे राज्यातही शिवसेनेच्या सोबतीने पुन्हा एकदा सत्तेवर येण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. विरोधी पक्षातून भाजपत आलेल्या काही जणांना रविवारी मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले. यातूनही भाजपने निवडणुकीच्या गणितांचा विचार केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra budget 2019 sudhir mungantiwar to presents state budget for 2019 20 today tuesday 18 june 2019