पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्रानं मला भरभरून दिलं, आता कोणतीही इच्छा नाहीः शरद पवार

शरद पवार (TWITTER)

महाराष्ट्रानं मला भरभरून दिले आहे आता माझी कोणतीही इच्छा नाही, असे भावनिक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. औरंगाबाद येथे ते बोलत होते. ते म्हणाले की, जनतेने मला चार वेळा मुख्यमंत्री केले, देशाचा संरक्षण मंत्री केले, १० वर्षे कृषीमंत्री केले. जनतेने मला भरभरून दिले आहे. आता मला आणखी काही नको. अखेरच्या श्वासापर्यंत अवघ्या महाराष्ट्रासाठी काम करणे हीच माझी इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

दिवाळीपूर्वीच राज्यात नवं सरकार सत्तेत

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही केली. नाशिकच्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर टीका केली. पाकिस्तानची मी स्तुती केल्याचे ते बोलले. वास्तवात, पाकिस्तानमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सत्ताधारी व सैन्य ज्यांच्या हातात ते सैन्याधिकारी सतत भारताविरोधात बोलतात, वातावरण तयार करतात, असे मी म्हणालो. 

आपल्या हातात सत्ता कायम राहावी, अधिकार कायम राहावेत याची ते काळजी घेतात. पाकिस्तानचे सत्ताधारी, पंतप्रधान, राष्ट्रपती, सैन्याधिकारी हे सगळेजण पाकिस्तानच्या जनतेला धोका देतात, हे मी बोललो. आणि मोदी इथे सांगतात मी पाकिस्तानची स्तुती केली. ही काय पाकिस्तानची स्तुती आहे?, असा सवाल त्यांनी केला.

१९६७ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी मी पहिल्यांदा निवडून आलो. ७ वेळा संसद व ७ वेळा विधिमंडळात गेलो. महाराष्ट्राच्या जनतेने मला कधी अपयश येऊ दिले नाही. जो माणूस सतत ५२ वर्षे एकही दिवसाची सुटी न घेता काम करतो, त्याच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी आपली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. 

पुलवामासारखी घटनाच महाराष्ट्रातील जनतेचं मत बदलू शकतेः शरद पवार

‘विकासाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा कुणाचा हात धरून जावे असा प्रश्न येतो तेव्हा शरद पवार हेच नाव माझ्यासमोर येते.’ हे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. कधी म्हणता माझी करंगळी धरून चालता. मग निवडणूक आली की असे बोलता. हे वागणे बरे नव्हे. हे बोलणे योग्य नाही.

ते काहीही बोलण्याइतके कर्तृत्ववान आहेत. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. मलाही बोलता येतं पण मी बोलणार नाही. त्याचं कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे. हे पद लोकशाहीमधील महत्वाचं पद आहे. या पदाची मला किंमत ठेवायची आहे. या पदाची मला अप्रतिष्ठा होऊ द्यायची नाही, हे मी मुद्दाम सांगतो.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकला काय बोलले त्याने फरक पडत नाही. कारण ते काहीही बोलू शकतात. कारण नागपूरचे त्यांच्यावर संस्कारच हे आहेत. त्यामुळे हे फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय, कुठलेही फडणवीस काय बोलणार हे सांगायची गरज नाही. पण पंतप्रधानांनी असे बोलण्याची गरज नव्हती.

साताऱ्यातील लोकसभेची पोटनिवडणूक लांबणीवर, उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्ष

यावेळी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. काही जण आज पक्ष सोडून जात आहेत. मराठवाड्यातील काही नेते सोडून गेले आहेत. म्हणतात, आम्हाला विकास करायचा आहे. अरे तुम्हाला इतकी वर्षे सत्ता दिली तेव्हा काय केले? या जनतेने मोठे केले, पक्षाने हवे ते दिले. तरी गद्दारी करता?, असा सवाल केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 ncp chief sharad pawar emotional appeal to people says maharashtra gives lots of i dont want anything