पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BLOG: निवडणुकांचा काळ सुखाचा

निवडणूक प्रचार (प्रतिकात्मक छायाचित्र)

शीर्षक वाचून थोडं आश्चर्य वाटलं असेल, हो ना? पण सध्या तशीच परिस्थिती आहे, निवडणूक म्हटलं की एखाद्या पक्षाची पुरेपूर दमछाक होते. खरं तर मी कार्यकर्त्यांची दमछाक होते असे म्हणायला हवे. कारण पक्ष हा कार्यकर्त्यांनी तयार झालेला असतो (असा समज तरी प्रचलित आहे). पण असो....पक्ष म्हटलं की त्याची तत्वं आली, जाहीरनामा (नावाप्रमाणे फक्त जाहीर होतो आजकाल) आला. मग तो पक्ष किती मोठा त्याप्रमाणे त्याची छपाई करणं क्रमप्राप्त झालं. म्हणजे इथे नवा रोजगार उपलब्ध होवू शकतो, हे ध्यानात घेतलं पाहिजे. आजकाल डिजिटल जमान्यात फेसबुक पेज, ट्विटर आणि त्यास फॉलोअर्स असणे म्हणजे हा एक मौल्यवान ठेवाच म्हणावा लागेल. 

विधानसभा निवडणूक २०१९: ये जो पब्लिक है, यह सब जानती है..

निवडणुकीच्या काळात जेवढा रोजगार उपलब्ध होवू शकतो तेवढा रोजगार कार्यकर्त्यांना अथवा संबंधित व्यावसायिकांना (निवडणूक प्रकारातील व्यावसायिक) संपूर्ण पाच वर्षात उपलब्ध होत असेल का ? यावर अभ्यास करावा लागेल. आजच्या निवडणुका म्हणजे काही पक्षांसाठी अस काहीसं समीकरण आहे की, निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानापर्यंत जी काही मेहनत घ्यायची ती घ्यायची, नंतर आहेच, “विश्रांती” !! म्हणजे एखाद्या लग्न समारंभ कार्यक्रम (इव्हेंट) व्यवस्थापन कंपनीसारखं आठ-पंधरा दिवस (लग्न मोसमात) कार्यक्रम करायचे आणि नंतर विलासी सत्ता भोगायची. त्यावेळी कुठला जाहीरनामा आणि कुठले कार्यकर्ते ? असे होत आहे असे तुम्हास वाटत नाही का?

BLOG : पर्वती मतदारसंघाची अशीही ओळख

निवडणुका म्हणजे सुद्धा इव्हेंट व्यवस्थापन होत आहे अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. बरोबर निवडणुका काळात (एवढ्याच मोसमात जोरदार व्यवसाय करायचा पुढे निवांत !) उगवणारे व्यावसायिक ज्यामध्ये मतदारांची माहिती सांगणारे मोबाईल अॅप, बूथ क्रमांक, बूथ लोकेशन, उमेदवाराच्या नावाने मेसेजेस पाठविणारी सेवा देणारे, सर्व काही एकाच क्लिकवर रेडी, उमेदवाराने फक्त दाम मोजायचे. ज्याच्याकडे दाम तो “स्मार्ट उमेदवार” म्हणायचा. या काळात होणारी उलाढाल देखील डोळे विस्फारण्यास भाग पाडेल एवढी होते, असे ऐकिवात आहे. बाकी सेवा करण्याची संधी द्या म्हणणारे उमेदवारांचे फलक हे फक्त फलक बनून राहतात. पक्ष, देशसेवा, हे सारे शब्द म्हणजे सोन्याचा मुलामा दिलेले शब्द वाटून राहतात आणि मुख्य उद्दिष्टास फाटा दिला जातो अस प्रतीत होतं.  

मला आठवतं नव्वदच्या दशकात जेव्हा निवडणुका व्हायच्या. तेव्हा एक वेगळंच वातावरण पाहायला मिळायचं. रिक्षा, व्हॅनमधून होणारा प्रचार (“ताई-माई, अक्का” वाला फ्लेवर क्वचितच कुणी विसरला असेल !), घरोघरी होणाऱ्या भेटी, उमेदवार जातीने घरोघरी फिरायचे (हे आताही होतं पण सिलेक्टिव्ह लोकेशन्स वर), किमान त्यावेळी तर उमेदवार पाहायाला मिळायचा. आजकाल पक्षाच्या नावावर निवडून येणाऱ्या (काही ठिकाणी, काही प्रमाणात) उमेदवाराचे तेवढेही दर्शन होत नाही ही वस्तुस्थिती आहे. 

BLOG : निमित्तमात्र बनलेला अर्जुन

उमेदवाराचे संपूर्ण घर कार्यकर्ता भूमिकेत रमून जायचं आणि मतदान होईपर्यंत प्रत्येक जण त्याच भूमिकेत राहायचा. आजही हे पाहायला मिळतं, नाही असं नाही पण काही तरी मिसिंग आहे याची सल राहते. निवडणुकांमध्ये डिजिटल लाट आली आणि सर्व काही बदललं. ही निवडणुकांची डिजिटल क्रांतीच म्हणावी लागेल. प्रचार डिजिटल सुरु झाला आणि गंमतशीर भाग म्हणजे हा प्रचार आजकाल उमेदवाराचा काळ पूर्ण होईपर्यंत सुरु असतो. म्हणजे या निवडणुका ते पुढील निवडणुकांपर्यंत.

सामान्य नागरिकांचे प्रश्न स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही अजून जसेच्या तसे का आहेत? यावर चर्चा कधी होणार ? यावर मार्ग कधी काढला जाणार. मतदार याविषयी जागा कधी होणार? आजही ज्या गावात एसटी महामंडळाची बस जात नाही, अशा गावात सेवा कधी उपलब्ध होणार, जिथे वीज, पाणी या मुलभूत गरजांची वानवा आहे, तिथे याची पूर्तता कधी होणार ? जिथे दुष्काळ आहे तिथे या पाशातून मुक्ती कधी मिळणार? रोजगाराची समस्या फक्त निवडणुकांपूरती न संपता कायम स्वरूपी यावर तोडगा कधी निघणार? याचा अर्थ काहीच बदल झाला नाही, असे नाही पण ज्या बाबींवर आजही निवडणुका होतात. त्या कुठेतरी खटकतात. आजही त्याच त्याच विषयांवर निवडणुका आणि उमेदवार निवडून द्यायचा आणि त्यांनी मात्र ये रे माझ्या मागल्या करायचं. हे आता थांबायला हवं.

BLOG : २५ वर्षांनी कसब्याचे नेतृत्त्व करणार नवा चेहरा!

मतदार आता सुशिक्षित झाला आहे. त्याला आता सांगावे लागत नाही. त्याला  त्याची गरज, आवश्यकता माहिती आहेत. त्याप्रमाणे त्या पूर्ण करण्याची आणि एक बळकट राष्ट्र बनवण्याची त्याचीही तितकीच जबाबदारी आहे. हे आता ध्यानात घेण्याची वेळ आली आहे. मतदानादिवशी मतदान करण्यास बाहेर पडण्याची गरज ओळखावी लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी काही मतदार (भारतीय- ज्यांची नावे मतदार यादीत होती अशी मंडळी) परदेशातून खास मतदानासाठी आले होते, हे विशेष ! बदल होतो आहे. पण तो व्यापक स्वरूपात होणे आवश्यक आहे, हे मात्र आवर्जून नमूद करावे वाटते.

BLOG : ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला खडकवासला मतदारसंघ!

या बदलाचे आपण ही साक्षीदार होवू शकलो. तर यावर विचार आणि कृती व्हावी नाहीतर आहेच, निवडणुकांचा काळ सुखाचा !!
 
- अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर.