पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवाळीपूर्वीच राज्यात नवं सरकार सत्तेत

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा

महाराष्ट्रात निवडणुका कधी जाहीर होणार याची उत्सुकता अखेर आज (शनिवारी) संपुष्टात आली. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात २८८ जागांवर निवडणूक होणार असून २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. निवडणूक आयुक्तांच्या घोषणेनंतर दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात नवे सरकार सत्तेवर येणार आहे. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार नसल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वासह खासदारकीचा राजीनामा दिल्याने विधानसभा निवडणुकीसह सातारा येथे पोटनिवडणूक होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. 

महाराष्ट्रातील २८८ जागांसह हरियाणातील ९० जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा सुनील अरोरा यांनी केली. राज्यातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल..
२७ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
४ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर - अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर - मतदान
२४ ऑक्टोबर - मतमोजणी

प्रारंभी सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा मतदानासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार असून त्यासाठी १.८ लाख ईव्हीएम मशीनचा वापर केला जाणार आहे. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ही २८ लाख करण्यात आली आहे. ३० दिवसांच्या आत उमेदवारांना हिशेब देणे बंधनकारक असेल. निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केल्याचे अरोरा यांनी सांगितले. खास सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली जाणार आहे. 

उमेदवाराने आपल्यावरील गुन्ह्याची माहिती देणे बंधनकारक आहे. नक्षलप्रभावित गडचिरोली-गोंदियामध्ये विशेष सुरक्षा असेल. दोन्ही राज्यात मतमोजणी ही २४ ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कालावधी ९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. 

दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी उमेदवारांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचा सल्ला दिला.

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीबरोबरच देशातील विविध राज्यातील ६४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. यात अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, आसाम, गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ. मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:maharashtra assembly election 2019 and Haryana Assembly elections to be held on 21st October counting on 24th October